मुंबई नगरी टीम
मुंबई : लॉक डाऊनमुळे राज्याच्या महसूलावर मोठा परिणाम झाला आहे.केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये मद्य विक्रीची दुकाने सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.आता राज्य सरकारनेही मुंबई महानगर प्रदेश,पुणे महानगर प्रदेश आणि मालेगाव मधील कंटेन्मेंट झोन वगळता राज्यातील इतर ठिकाणी काही अटी आणि शर्थीवर वाईन शॉप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑरेंज व ग्रीन झोन व्यक्तिरिक्त कंटेन्टमेंट झोन वगळता इतर रेड झोनमध्ये जीवनावश्यक वस्तूच्या दुकानांबरोबरच रस्त्याच्या एका बाजूकडील (एका लेनमधील) जीवनावश्यक वस्तू नसलेली स्वतंत्रपणे असलेली पाच दुकाने (स्टॅंड अलोन) सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या पाच दुकानांमध्ये मद्य विक्रीच्या दुकानाचा (वाईन शॉप ) समावेश आहे.मात्र, एका लेनमध्ये पाचपेक्षा जास्त जीवनावश्यक नसलेली दुकाने सुरू करता येणार नाहीत.ही दुकाने सुरू करताना सोशल डिस्टन्सिंग, गर्दी न करणे यासारखी इतर नियमांचे कडकपणे पालन करणे आवश्यक असणार आहे. मुंबई महानगर प्रदेश, पुणे महानगर प्रदेश आणि मालेगाव महानगरपालिका या कंटेन्मेंट झोन मधील वाईन शॉप बंदच राहणार आहेत.मुंबई, पुणे वगळता इतर भागात जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची एकल (स्टॅंड अलोन) दुकाने सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
राज्य सरकारच्या तिजोरीत महसुलाच्या माध्यमातून रक्कम येत नसल्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहून कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यात वेतन देण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे.राज्य उत्पादन शुल्कच्या माध्यमातून राज्य सरकारच्या तिजोरी मोठा महसूल जमा होतो.परंतु वाईन शॉप बंद असल्यामुळे सरकारचा मोठा महसूल बंद झाला आहे.लॉक डाऊनच्या काळात राज्यातील विविध ठिकाणी वाईन शॉप फोडण्याचे प्रकार घडले आहेत. राज्याच्या तिजोरीचा विचार करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाईन शॉप सुरू करण्याची मागणी केली होती.अखेरीस राज्य सरकारने वाईन शॉपचे दरवाजे खुले करण्याचे आदेश दिले असल्याने तळीरामांचा जीव भांड्यात पडला आहे.