मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्य शासनाने कंटेन्टमेंट झोन वगळता इतर भागातील वाईन शॉप आजपासून सुरू करण्यास मान्यता दिली आहे. मात्र या ठिकाणी वाईन शॉपच्या मालकासह ग्राहकांना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.वाईन शॉप सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतच सुरू राहणार असून,एकाच वेळी केवळ ५ ग्राहकांना सामाजिक अंतराचे पालन करीत, मास्क घातले असल्यासच सीलबंद मद्य दिले जाणार आहे.नियमांचे पालन न केल्यास दुकान बंद करण्यात येवून त्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
आजपासून राज्यातील कंटेन्टमेंट झोन वगळता इतर भागातील वाईन शॉप सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.मात्र अशी वाईन शॉप सुरू करतानाच राज्य उत्पादन शुल्क विभागाने या साठी कडक नियम व अटी घातल्या आहेत.आजपासून सुरू होणा-या वाईन शॉप मधून केवळ सीलबंद मद्य विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे.सकाळी १० वाजता सुरू होणारे वाईन शॉप सांयकाळी ६ वाजेपर्यंतच सुरू राहणार असुन,या ठिकाणी ५ पेक्षा जास्त ग्राहकांना गर्दी करता येणार नाही.मद्य विकत घेताना दोन ग्राहकांमध्ये ६ फुटाचे अंतर ठेवावे लागणार आहे.त्याकरिता दुकानासमोर सहा फुटाच्या अंतरावर वर्तुळ आखून या वर्तुळामध्येच सामाजिक अंतराचे पालन करून मद्य खरेदी करावे लागणार आहे. मद्य खरेदी करण्यास येणा-या प्रत्येक ग्राहकांचे स्कॅनिंग करण्यात येणार असून,ज्यांनी मास्क घातले आहे अशा ग्राहकांनाच सीलबंद मद्य देण्यात येईल.ज्या ग्राहकास सर्दी,खोकला व ताप असेल अशा व्यक्तींना वाईन शॉप मध्ये प्रवेश दिला जाणार नाही.ग्राहकांना वाईन शॉप मध्ये मद्य प्राशन करता येणार नसून, वाईन शॉप परिसरात थुंकण्यास मनाई असणार आहे.दुकानदार किंवा ग्राहकांकडून नियमभंग झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
वाईन शॉपच्या मालकाला नोकरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे.तसेच त्यांना दर दोन तासांनी दुकान आणि सभोवतालचा परिसर निर्जंतूकीकरण करणे आवश्यक केले आहे.ग्राहकांसाठी हॅण्ड सॅनिटायझर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही वाईन शॉपच्या मालकाची असणार आहे.शहरी भागातील महानगरपालिका व नगरपरिषद हद्दीतील मॉल्स,बाजार संकुल व बाजारातील मद्यविक्री दुकाने चालू करता येणार नाहीत. कंटेन्टमेंट झोन वगळून शहरी भागातील सर्व प्रकारची स्वतंत्र किरकोळ मद्यविक्रीची दुकाने व निवासी संकुलातील दुकाने सुरू करता येणार आहेत. मुंबई महानगर प्रदेश मधील सर्व महानगरपालिका क्षेत्र तसेच मालेगाव पुणे,व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील स्वतंत्र किरकोळ मद्यविक्रीची दुकाने स्थित असलेल्या गल्ली, रस्त्यांवर अत्यावश्यक वस्तू विक्री दुकानाव्यतिरिक्त व्यवहार सुरू असलेल्या इतर दुकानांमध्ये कमाल ५ दुकाने सुरू राहू शकतील.