मुंबईत आजपासून दारूची दुकाने बंद

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात लॉकडाऊन वाढवतानाच मद्य विक्रीची दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती.राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण एकट्या  मुंबईत असतना मुंबईत मद्य विक्री करणारी दुकाने उघडताच तळीरामांनी सर्व नियम धाब्यावर बसवून दुकानांसमोर तोबा गर्दी केल्याचे चित्र संपूर्ण मुंबईभर होते.करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत.त्याची अंमलबजावणी आजपासून करण्यात येणार असल्याने दोनच दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेली दारूची दुकाने आता येत्या १७ तारखेपर्यंत बंद राहणार आहेत.

केंद्र सरकारने लॉकडाऊन  येत्या १७ मेपर्यंत वाढवला असला तरी काही प्रमाणात दुकाने उघडण्यास सूट दिली होती. यामध्ये दारू विक्रीची दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.त्यामुळे राज्यातील काही भाग वगळाता सर्व ठिकाणची दारू विक्री करणारी दुकाने दोन दिवसांपूर्वी उघडण्यात आली होती.मात्र दारूची दुकाने सुरू होताच अनेकांनी मद्य खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.मुंबईच्या गर्दीच्या ठिकाणी  ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र संपूर्ण मुंबईत होते. या निर्णयामुळे सामाजिक अंतर राखण्याच्या आदेशाचा पुरता बोजवारा उडाला होता.दारू विक्री करणा-या दुकानांपुढे होणारी गर्दी पाहता सर्वांधिक रूग्ण असलेल्या मुंबईत करोनाच्या संसर्गाचा धोका वाढण्याची अधिक शक्यता होती.दारू विक्रीची दुकाने सुरू झाल्यामुळे सर्वच स्तरातून टीका होऊ लागली होती.विविध सामाजिक संघटना आणि विरोधी पक्षनेत्यांनी गर्दी नियंत्रणात आणता येत नसेल तर ही दुकाने बंद करण्याची मागणी केली होती.

मुंबईत दरदिवशी मोठ्या प्रमाणात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.अशा परिस्थितीत नागरिकांनी गर्दी करणे परवडणारे नसल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत केवळ जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने खुली ठेवण्याचा  निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे गेले दोन दिवस मुंबईतील काही भागात सुरू करण्यात आलेली दारू विक्रीची दुकाने आजपासून बंद ठेवावी लागणार आहेत.

Previous articleराज्यात आज ८४१ नवीन कोरोनाबाधीत; रुग्णांची संख्या १५ हजार ५२५
Next articleबापरे…दोन दिवसांत तब्बल ६२ कोटींची दारू खपली