मुंबई नगरी टीम
मुंबई : शिवसेनेचे आमदार व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघात नागरिकांना रेशनिंग दुकानातून देण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या व जनावरांसाठीही खाण्या योग्य नसलेल्या तांदूळ व गहू वितरित केलेल्या रेशनिंग दुकानावर विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी धाड टाकली व कोरोनासारख्या संकटसमयी नागरिकांना देण्यात येणा-या निकृष्ट धान्याच्या सरकारी वाटपाच्या बेजबाबदार कारभाराचा पर्दाफाश केला.यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.
वरळी मतदारसंघातील गोपाळ नगर या विभागातील नागरिकांना रेशनिंग दुकानांवर निकृष्ट दर्जाचे गहू व धान्य वाटपाची तक्रार विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांना प्राप्त झाली. त्यांनी या गंभीर घटनेची दखल घेत त्यांनी आज आमदार लोढा यांच्यासह थेट वरळी येथील पांडुंरग बुधकर मार्गावरील श्रीमहालक्ष्मी को.ऑप.हौ.सोसायटी येथील तळमजल्यावरील रेशनिंग दुकांनावर (क्र.२० क ६५) धाड टाकली. यावेळी रेशनिंग विभागाचे अधिकारी, पोलिस उपस्थित होते. विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी दुकानवर धाड टाकल्यानंतर रेशनिंग दुकानदाराची भंबेरी उडाली. त्या दुकानावर निकृष्ट दर्जाचा गहू, तांदुळ उपलब्ध होता. यासंदर्भात दरेकर यांनी तेथे उपस्थित रेशनिंग अधिकारी यांना या गंभीर घटनेची तात्काळ दखल घेऊन दुकानदारावर कारवाई करण्याचे आदेश दिले. रेशनिंगवर मिळणारे हे धान्य निकृष्ट व खराब दर्जाचे असल्याचे दुकानदाराने मान्य केले. पण गेल्या काही दिवसांपासून असेच धान्य आम्हाला मिळत आहे व हेच धान्य आम्ही रेशनिंगवरुन वितरिक करीत आहोत अशी कबुलीही त्या दुकानदाराने दिली.
यासंदर्भात बोलताना दरेकर यांनी सांगितले की, वरळी येथे राहणारे प्रकाश पोईपकर यांच्यासह अन्य काही जणांनी आपल्याकडे या रेशनिंगवरुन वितरित करण्यात येणा-या निकृष्ट धान्याबाबत तक्रार केली. हे खराब धान्य आम्हाला खाण्यायोग्य नसल्यामुळे आता मी हे सर्व धान्य फेकून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु हे धान्य फेकून देऊ नका मी या घटनेची दखल घेतो असे सांगितले व आज तातडीने दरेकर यांनी या रेशनिंग दुकावावर धाड टाकून या निकृष्ट धान्य वाटपाचा पर्दाफाश केला. तसेच रेशनिंग कंट्रोलर पगारे यांना या रेशनिंग दुकानावर कारवाई करण्याची सूचना दिली. कोरोना सारखी गंभीर परिस्थिती असताना व जनतेला रेशिनिंगवर अश्या प्रकारचे खराब धान्य मिळत असल्याची बाब गंभीर असून यासंदर्भात आपण मुख्यमंत्री व अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यानंतर दरेकर व लोढा यांनी तक्रारदार पोईपकर यांनी चांगल्या दर्जाचे गहू व तांदूळ असे धान्याचे वाटप केले. तक्रारदार प्रकाश पोईपकर यांनी सांगतिले की, रेशनिंग दुकानावर निकृष्ट दर्जाचे धान्य मिळाल्यानंतर यासंदर्भात आपण रेशनिंग अधिका-यांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी दाद दिली नाही.तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयात तक्रार करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेतली नाही. मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकानेही या प्रकाराबद्दल आम्हाला प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे अखेर आम्ही विरोधी पक्ष नेते दरेकर यांच्याकडे दाद मागितली व त्यांनी आम्हाला न्याय मिळवून दिला. असेही पोईपकर यांनी सांगितले.