पक्ष बळकटीसाठी शशिकांत शिंदेंकडे राष्ट्रवादीचे  प्रदेशाध्यक्षपद देणार ?

मुंबई नगरी टीम

मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी माजी मंत्री शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांना राष्ट्रवादीकडून संधी दिला जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असतानाच पक्ष बळकटीसाठी माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्याकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सोपविले जाणार असल्याचे समजते.

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे,विदर्भातील राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांना राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी संधी दिली जाणार आहे.शिंदे यांचा पराभव पक्षाच्या जिव्हारी लागला आहे. त्यातच  खासदार उदयनराजे भोसले यांनी पक्ष सोडल्याने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणा-या सातारा जिल्ह्यात पक्ष पुन्हा उभा करण्याचे राष्ट्रवादीपुढे मोठे आव्हान आहे. त्यामुळे शशिकांत शिंदे यांना पक्षाकडून संधी दिली जाण्याची शक्यता आहे.विदर्भामध्ये राष्ट्रवादीची ताकद नगण्य आहे. याठिकाणी पक्षाला बळकटी देण्याचे काम मिटकरी यांच्या माध्यमातून होईल,अशी शक्यता गृहीत धरून राष्ट्रवादीकडून त्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

सध्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद मंत्री जयंत पाटील यांच्याकडे आहे. मंत्री आणि प्रदेशाध्यक्षपद या दोन्ही भूमिका बजावणे शक्य नसल्याने  त्यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपद शशिकांत शिंदे यांना दिले जाणार असल्याचे समजते.साता-यातील पक्षाचे नेते उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्याने नुकतीच झालेली सातारा लोकसभेची पोटनिवडणूक ही शरद पवार यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची होती.भाजपने  राजकीय बळ दिलेले उदयनराजे भोसले यांच्या पराभवात आणि राष्ट्रवादीचे उमेदवार  श्रीनिवास पाटील यांच्या विजयात  शिंदे यांचे मोठे योगदान होते. भाजपने  उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर संधी दिल्याने त्यांच्याशी राजकीय सामना करू शकेल, असा साताऱ्यामध्ये राष्ट्रवादीच्या फौजेत एकही नेता नसल्याने आमदारकीसह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद देऊन शिंदे यांना मोठी ताकद देण्याचा प्रयत्न पवार करणार असल्याची चर्चा आहे.

Previous articleभाजपचा ज्येष्ठ नेत्यांना दे धक्का ;या नव्या चेह-यांना दिली संधी
Next articleस्थलांतरित मजुरांसाठी भरारी पथकांची नियुक्ती करा: शरद पवार