मुंबई नगरी टीम
मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.यावेळी मुख्यमंत्र्यांचे कुटुंब तसेच महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते उपस्थित होते.९ जागांसाठी केवळ ९ अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
येत्या २१ मे रोजी विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक होत असून,उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आज शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,नीलम गो-हे,राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे,अमोल मिटकरी, तर काँग्रेसकडून राजेश राठोड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मुख्यमंत्री ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा अर्ज दाखल करताना उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे,पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,तेजस ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि मंत्री उपस्थित होते.भाजपने आपल्या चार उमेदवारांचे अर्ज यापूर्वीच भरले आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या डॉ.नीलम गो-हे, भाजपचे रणजितसिंह मोहिते पाटील,गोपीचंद पडळकर, डॉ. अजित गोपछेडे,प्रवीण दटके आणि काँग्रेसतर्फे राजेश राठोड यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा लवकरच करण्यात येईल.