मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यात या शैक्षणिक वर्षांपासून पहिली व सहावी या वर्गासाठी सर्व माध्यमांच्या शाळांतून मराठी भाषा विषय शिकविणे सक्तिचे केले जाणार आहे. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई व शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड यांनी या संदर्भातील कार्यवाहीचा आढावा घेतला.
महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य करणे हा कायदा मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकमताने दोन्ही सभागृहांनी मंजूर केला आहे. या कायद्याची अंमलबजावणी आगामी शैक्षणिक वर्षापासून सुरू होईल, असे आश्वासन मराठी भाषा विभागमंत्री सुभाष देसाई व शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अधिवेशनात दिले होते. त्याच अनुषंगाने होत असलेल्या कार्यवाहीचा आज आढावा घेण्यात आला. या संदर्भात शिक्षण आयुक्त विश्वास सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आज बैठक घेण्यात आली. आगामी शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी मराठी भाषेचा वर्गवार अभ्यासक्रम, इयत्ता पहिली व सहावीसाठी पाठ्य़पुस्तके आणि प्राशिक्षण साहित्य, तयार करण्याबाबत सूचना केली. तसेच २०२०-२१ च्या प्रथम सत्रापासून सर्व माध्यमांच्या शाळांनी मराठी विषय सक्तीने शिकविण्याच्या कायद्याचे अनुपालन करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने अधिसूचना निर्गमित करावी, असेही सूचविण्यात आले.शालेय शिक्षणमंत्री गायकवाड यांनी कायद्याच्या अमंलबजावणीसाठी क्षेत्रिय अधिकाऱ्यांची बैठक घेतल्याचे आणि नियमावली तयारी करण्यासाठी एका कार्यबल गटाची स्थापना केल्याचे सांगितले. या कार्यबल गटात मराठी भाषा विभागाच्या प्रतिनिधींचा समावेश करण्याची सूचना देसाई यांनी केली.