सरपंच,उपसरपंच निवडीचा मार्ग मोकळा ; ग्रामपंचायतींच्या बैठका घेण्यास परवानगी

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात काही ग्रामपंचायतींच्या रिक्त असलेल्या सरपंच व उपसरपंचपदांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.सरपंच व उपसरपंचपदांच्या निवडीसाठी आवश्यक असलेली ग्रामपंचायतींच्या या बैठका घेण्यास संमती देण्यात आली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करुन घेण्यात याव्यात,अशा सूचना राज्याचे ग्रामविकास मंत्री  हसन मुश्रीफ यांनी दिल्या आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीशी संबंधित कामकाज आहे, त्या टप्प्यावर स्थगित करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने १७ मार्च २०२० रोजी आदेश दिले होते. तथापि, राज्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये आधीच्या सरपंच, उपसरपंचांचे राजीनामे झाले आहेत. या ग्रामपंचायतींमध्ये आता नवीन सरपंच, उपसरपंचांची निवड करावयाची आहे. विशेषत: कोल्हापूर जिल्ह्यातून याबाबत विचारणा होत आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यातील ज्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंच यांच्या राजीनाम्यामुळे किंवा इतर कारणाने ही पदे रिक्त झाली आहेत, त्या ग्रामपंचायतींमध्ये या पदांची निवड होण्यासाठी ग्रामपंचायतीची बैठक घेण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून, यासाठी संबंधीत तहसीलदारांना निर्देश देण्यात यावेत व सरपंच, उपसरपंच पदांची निवड करण्यात यावी. तसेच या बैठका घेताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत, असे मंत्री  मुश्रीफ यांनी सांगितले. यासंदर्भातील शासन आदेश निर्गमित करण्यात आला आहे.

Previous articleकोरोना इफेक्ट : कारागृहातील  सतरा हजार कैद्यांना सोडणार
Next articleराज्यात ग्रामसभा घेण्यास तात्पुरती स्थगिती