राज्यात ग्रामसभा घेण्यास तात्पुरती स्थगिती

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात गावांमध्ये घेतल्या जाणाऱ्या ग्रामसभांना पुढील आदेश होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना विषाणुचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे मे महिन्यात घेणे बंधनकारक असलेली ग्रामसभा यंदा होऊ शकणार नाही. यासंदर्भातील आदेश निर्गमित करण्यात आले असून जिल्हा प्रशासनास तसे निर्देश देण्यात आल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री  हसन मुश्रीफ यांनी दिली.

ग्रामपंचायतींच्या कामकाजात लोकांचा सहभाग वाढावा याउद्देशाने गावांमध्ये ग्रामसभा घेतल्या जातात. प्रत्येक वित्तीय वर्षात किमान ४ ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. या ग्रामसभा न घेतल्यास सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांना जबाबदार धरुन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची तरतूद आहे. तथापी,राज्यात सध्या सुरु असलेल्या कोरोना विषाणुच्या संक्रमणाच्या काळात सर्व प्रकारचे मेळावे, कार्यक्रम यावर बंदी घालण्यात आली असून लोकांना अधिक संख्येने एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे गावांमध्ये ग्रामसभांचे आयोजन केल्यास होणाऱ्या गर्दीची स्थिती लक्षात घेता ती टाळण्यासाठी राज्यात ग्रामसभा घेण्यास पुढील आदेश होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर मे महिन्यात बंधनकारक असलेल्या ग्रामसभेचे यंदा आयोजन करण्यात येऊ नये. तसेच पुढील आदेश होईपर्यंत इतर कोणत्याही ग्रामसभेचे आयोजन करण्यात येऊ नये, असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले.

Previous articleसरपंच,उपसरपंच निवडीचा मार्ग मोकळा ; ग्रामपंचायतींच्या बैठका घेण्यास परवानगी
Next articleदारू घेण्यासाठी परमीट नाही ? आपणास परमीट घ्यायचे आहे तर ही बातमी वाचाच