मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोरोनाचा संसर्ग आणि वाईन शॉप मध्ये होणा-या गर्दी पासुन सुटका व्हावी या साठी घरपोच मद्य पोहचविण्याचा निर्णय घेतला आहे.ज्या ग्राहकाला मद्य खरेदी करायचे आहे त्यांच्याकडे परवाना ( परमीट ) असणे बंधनकारक केल्याने अनेकांची अडचण झाली आहे.मात्र मद्य मागणी करणा-या ग्राहकाकडे मद्य परवाना नसेल तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संकेतस्थळावर ( वेबसाईट) असा परवाना मिळण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच संबंधित वाईन शॉप मालकाकडूनही परवाना वितरीत केला जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी वाईन शॉप मध्ये होणा-या गर्दी पासुन सुटका व्हावी आणि कोरोना साथीच्या रोगाचा प्रसार होवू नये यासाठी इ – टोकन सुविधा उपलब्ध केली आहे.ही सुविधा www.mahaexcise.com या संकेत स्थळावर सुरू केलेली आहे.आता टाळेबंदीच्या कालावधीत कंटेनमेंट झोन वगळुन वाईन शॉप मालकांना ग्राहकांना घरपोच मद्य विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे.त्यानुसार अटी आणि शर्थीचे पालन करून देशी दारू वगळता भारतीय बनावटीचे विदेशी मद्य,बीअर,सौम्य मद्य,वाईनची विक्री परवानाधारकास त्यांच्या निवासी पत्तावर घरपोच देण्यात येणार आहे.यासाठी परवानाधारक ग्राहकास मद्यासाठी मागणी नोंदविणे आवश्यक आहे.सध्या सुरू करण्यात आलेली घरपोच मद्य विक्रीची सेवा राज्यात टाळेबंदी असे पर्यंत सुरू राहणार आहे.ही सेवा गुरूवार पासून सुरू करण्यात येणार होती मात्र वाईन शॉप मालकांना डिलीव्हरीसाठी मुले मिळविणे,त्यांची वैद्यकीय तपासणी करणे,ओळखपत्र देणे,इतर प्राथमिक तयारीसाठी अजून एका दिवसाची आवश्यकता असल्याने मद्य घरपोच उपलब्ध करून देण्याची सुविधा शुक्रवारी म्हणजेच १५ मे पासून सुरू करण्यात येणार आहे.
ज्या व्यक्तींकडे मद्य परवाना ( परमीट ) आहे. अशा व्यक्तींना मद्य घरपोच सुविधा देण्यात येणार आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या निर्णयामुळे अनेक मद्यप्रेमींचा हिरमोड झाला असतानाच आता त्यांना दिलासा देण्याचे काम या विभागाने केले आहे.ज्यांच्याकडे असा परवाना नाही अशा व्यक्तींना www.stateexcise.maharashtra.gov.in किंवा www.exciseservices.mahaonline.gov.in या वेबसाईटवर आवश्यक असलेल्या बाबी पूर्ण केल्यानंतर आपला परवाना ( परमीट ) तात्काळ प्राप्त करता येईल.किंवा संबंधित वाईन शॉप मालकांकडेही असा परवाना शुल्कासह उपलब्ध असणार आहे.मद्य बाळगणे,वाहतूक करणे आदी मद्यसेवन परवान्यातील तरतूदींचे कोणत्याही परिस्थितीत उल्लंघन होणार नाही याची दक्षता वाईन शॉप मालकांना घ्यावी लागणार आहे.तसेच वाईन शॉप मालक आणि डिलीव्हरी करणा-या व्यक्तींसह ग्राहकांना शासनाच्या आदेशाचे पालन करावे लागणार आहे.ज्यांना मद्याची खरेदी करायची आहे अशांना संबंधित वाईन शॉप मालकांकडे मागणीची नोंदणी करण्यासाठी व्हाटसअप,मेसेज,किंवा फोनचा वापर करावा लागणार आहे.वाईन शॉप मालकाला डिलीव्हरी देण्यासाठी १० पेक्षा जास्त मनुष्यबळ वापरता येणार नाही.ग्राहकाच्या मागणी पेक्षा जास्त वाहतुक करता येणार नाही.मद्य घरपोच देणारी मुले किंवा व्यक्तींना २४ युनिटपेक्षा जास्त मद्याची वाहतुक करता येणार नाही.ग्राहकांना घरपोच मद्य दिल्यावर त्यांना मद्य पोहचल्याची पावती द्यावी लागणार आहे.मद्य घरपोच झाल्यावर या मद्याची असणारी किंमत रोख स्वरूपात किंवा डेबिट अथवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातुन द्यावी लागणार आहे. मद्याची डिलीव्हरी करणा-या व्यक्तीला वैद्यकीय प्रमाणपत्र आणि स्वत:चे प्रमाणपत्र जवळ बाळगणे बंधनकारक आहे.