मुंबई नगरी टीम
मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी कांदिवली पश्चिम येथील शताब्दी रुग्णालयाला भेट दिली. कोरोनाच्या कालावधीत प्रशासनाकडून रुग्णालयात करण्यात आलेल्या नियोजनाचा दरेकर यांनी पाहणी केली व आढावा घेतला.
शताब्दी रुग्णालयातील डॉक्टरांकडून तेथील व्यवस्थेची माहिती घेतली. तसेच या रुग्णालयातील निवासी डॉक्टर्स संपावर गेल्याची माहिती मिळाल्यानंतर दरेकर यांनी तात्काळ मुंबई महानगरपालिका आयुक्त चहल यांच्याशी संर्पक साधला. कोरोना सारख्या संकटकाळात डॉक्टर्सने संपावर जाऊ नये असे आवाहनही दरेकर यांनी यावेळी केले.आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित शताब्दी रुग्णालयात कोरोना सारख्या संकटकाळातही अहोरात्र सेवाभावी काम करणा-या परिचारिकांचा सत्कार यावेळी विरोधी पक्ष नेते दरेकर यांच्या हस्ते करण्यात आला व त्यांच्या सेवेप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी आमदार भाई गिरकर, नगरसेविका प्रियांका मोरे, भगवती रुग्णालयाचे डॉ. गुप्ता, परिचारिका वर्ग आदी उपस्थित होते.