मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यात सध्या सुरू असणारा लॉकडाऊनचा तिसरा टप्पा येत्या १७ मे रोजी संपत असून,त्यानंतर लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे.या कालावधीत पावसाळ्याचा हंगाम सुरू होणार असल्याने छत्री,रेनकोट आणि प्लास्टिक शीट्स किंवा कव्हर यांचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
येत्या १७ मे रोजी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपत असून,केंद्र सरकारकडून येत्या १८ मे पासून लॉकडाऊनचा चौथा टप्पा जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.राज्यात साधारणत: ७ जूनच्या दरम्यान पावसाळ्याला सुरूवात होते.त्यामुळे जर १८ मे पासून सुरू होणारा लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मे पर्यंत वाढविला गेल्यास ऐन पावसाळ्यात विद्यार्थ्यांपासून ते शेतक-यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल.त्यानुसार येणारा पावसाळा लक्षात घेवून छत्री,रेनकोट आणि प्लास्टिक शीट्स किंवा कव्हर यांचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश केला आहे. लॉकडाऊनच्या काळात करावयाच्या उपायांच्या संदर्भात आज शासनामार्फत सुधारित मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. हा आदेश ३० सप्टेंबर पर्यंत लागू राहील. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून दिनांक २ मे २०२० रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये ही सुधारणा करण्यात आली आहे.