पहिल्याच दिवशी राज्यातील ५ हजार ४३४ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री

मुंबई नगरी टीम

मुंबई : गर्दी टाळणे, संपर्क टाळणे व संसर्ग टाळणे या भूमिकेतून आजपासून घरपोच मद्यसेवा सुरू करण्यात आली. आज दिवसभरात राज्यातील एकूण ५ हजार ४३४ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री देण्यात आली आहे. यापैकी नागपूर आणि लातूर येथील ४ हजार ८७५ ग्राहक असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

राज्यात आजपासून घरपोच मद्य विक्रीची सेवा सुरू करण्यात आली असून,पहिल्याच दिवशी याचा लाभ राज्यातील एकूण ५ हजार ४३४ ग्राहकांनी घेतला आहे. यामध्ये सर्वांधिक ग्राहक हे नागपूर आणि लातूर येथील आहेत.या दोन ठिकाणच्या एकूण ४ हजार ८७५ ग्राहकांनी घरपोच मद्य खरेदी केले आहे. राज्यात ३ मे  पासुन लॉकडाऊन कालावधीत सीलबंद  मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. सदर  मार्गदर्शक तत्वांना अनुसरुन राज्यातील ३३ जिल्ह्यात ( ३ ड्राय जिल्हे वगळता गडचिरोली, वर्धा व चंद्रपूर ) काही जिल्हयांमध्ये सशर्त अनुज्ञप्ती सुरू आहे तर काही जिल्हयांमध्ये मद्य विक्री बंद आहे. मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण १० हजार ७९१ किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी ४५९७ अनुज्ञप्ती सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त  उमाप यांनी दिली.

राज्यात २४ मार्च पासुन राज्यात लॉकडाऊन सुरु आहे.राज्यात शेजारील राज्यांमधुन होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्वविभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असुन १२ सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी,कर्मचारी तैनात आहे. काल १४ मे रोजी राज्यात ८४ गुन्हे नोंदविण्यात आलेअसून ४५ आरोपींना अटक करण्यात आली असून  २२ लाख ६२ हजार  रूपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २४ मार्च पासुन १४ मे पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण ५ हजार ४८९ गुन्हे नोंदविण्यात आले असून २ हजार ४५७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.तर ५५४ वाहने जप्त करण्यात आली असून १४ कोटी ९३ लाखांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Previous articleराज्यात कामगार ब्यूरोची स्थापना करणार
Next articleराज्यात आज कोरोनाचे १५७६ नवीन रुग्ण; ४९ रुग्णांचा मृत्यू