मुंबई नगरी टीम
मुंबई : राजकीय पत्रकार सुधीर सूर्यवंशी लिखित चेकमेट: हाऊ द बीजेपी वोन अँड लॉस्ट महाराष्ट्र या पुस्तकातील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी घडलेल्या राजकीय घडामोडींचे रहस्यमय कथन आपण गेल्या आठवड्यात आमच्या माध्यमातून वाचले आहे.निकालानंतर राज्यात भाजपला धक्का देण्याची नेमकी सुरूवात कशी झाली हे आज वाचूया.
पत्रकार सुधीर सूर्यवंशी लिखित ‘चेकमेट: हाऊ द बीजेपी वोन अँड लॉस्ट महाराष्ट्र’या पुस्तकात विधानसभा निवडणुकीनंतर पडद्यामागे घडलेल्या अनेक गोष्टींचा गौप्यस्फोट करण्यात आला आहे.राज्यात भाजपला सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील एका ठिकाणी झालेल्या गुप्त भेटीत प्लॅन कसा आखण्यात आला याचे कथन सुर्यवंशी यांच्या या पुस्तकात करण्यात आले आहे.राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला त्यादिवशी शरद पवार यांनी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी पत्रकारपरिषद घेतली.राज्यातील निकाल पाहता आमचा पक्ष विरोधी पक्षांची भूमिका बजावेल असे त्यांनी जाहीर केले होते.त्यानंतर ते पुण्याच्या दिशेने रवाना झाले.मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील प्रवास सुरू असताच पवार यांनी आपल्या ड्रायव्हरला पनवेलजवळच्या मॅकडोनल्ड जवळ गाडी थांबविण्यास सांगितले.
मॅकडोनल्ड जवळ संजय राऊत पवारांची प्रतिक्षा करीत थांबले होते. कोणाचेही लक्ष जायच्या आत पटकन संजय राऊत पवारांच्या गाडीत बसले.त्यानंतर गाडी पुण्याच्या दिशेने रवाना झाली.शरद पवार आणि राऊत ज्या गाडीत बसून खलबतं करीत होते.त्या गाडीच्या मागे राऊतांची गाडी येत होती.शरद पवार आणि संजय राऊत या दोन नेत्यांमध्ये तळेगाव टोलनाक्यापर्यंत पोहचेपर्यंत सुमारे तासभर राजकीय चर्चा सुरु होती.भाजपला धक्का देण्यासाठी आपण एकत्र येवू असा प्रस्ताव राऊत यांनी पवारांसमोर ठेवला.आपण एकत्रित आलो तर स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न पूर्ण होईल,असेही राऊत यावेळी पवार यांना म्हणाले.राऊतांच्या या प्रस्तावानंतर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला.पवार यांनी याबाबत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी बोलण्याचे कबूल करतानातच,तुम्हीही राज्यातील काँग्रेस नेत्यांशी बोलाणी सुरू करा असा सल्ला पवारांनी राऊत यांना दिला.
या दोन नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असताना समोर तळेगाव टोलनाका दिसताच संजय राऊत हे पवारांच्या गाडीतून उतरले आणि पुन्हा आपल्या गाडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले.मुंबईत पोहचल्यानंतर संजय राऊत यांनी थेट मातोश्री गाठत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. पवारांसोबत झालेल्या तासाभराच्या प्रवासात जी चर्चा झाली त्याचा वृत्तांत त्यांनी ठाकरे यांच्या कानी घातला.हळूहळू राजकीय घडामोडी घडत गेल्या.वर्षावरील फडणवीस यांच्या पत्रकारांच्या दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि भाजपवर प्रहार केला.या अनपेक्षित घटनेने ठाकरे यांचा आक्रमक पवित्रा पाहून भाजपचे नेते अवाक झाले होते.