मुंबई नगरी टीम
नाशिक : राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्य जनतेपुढे संकट उभे राहिले आहे.सध्याच्या काळात याला शेतकरी राजाही अपवाद नाही.त्यातच सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या मालेगावात ईदच्या निमित्ताने मोठी खबरदारी घेणे गरजेचे असल्याने खुद्द राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी काल रविवारी रात्री सायकल काढून रात्रभर शहरात फिरून लोकांना घरातच आणि सुरक्षित ईद साजरी करण्याचे आवाहन केले. सध्या त्यांच्या या नाविण्यपूर्ण उपक्रमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे.मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे.त्यामध्ये ईद आल्याने मुस्लिम बांधवांनी ईद घरातच साजरी करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले होते.राज्यासह मालेगावातही कोरोनाने आपला विळखा घट्ट करण्यास सुरूवात केली आहे. मालेगावात वाढणारा कोरोनाचा आकडा प्रशासनाला चिंतेत टाकणारा असतानाच ईदच्या निमित्ताने लोक रस्त्यावर उतरल्यास या विषाणूंचा मोठ्या प्रादुर्भाव होण्याची भिती होती. ईदच्या पार्श्वभूमीवर शहरातील जनतेला आवाहन करण्याचे शिवधनुष्य राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी पेलले.काल रविवारचा दिवस मावळताच कॅबिनेटमंत्री दादा भुसे यांनी आपली सायकल काढली आणि ईदच्या पूर्वसंध्येला कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या मालेगावच्या चौकाचौकातून,गली-मोहल्ल्यातून स्वतःच्या जीवाची फिकीर न करता त्यांनी जनतेशी संवाद साधत लोकांना घरातच आणि सुरक्षित ईद साजरी करण्याची विनंती केली. त्यांनी यावेळी लोकांना घरात राहण्याचे आवाहन करत ईदच्या शुभेच्छा दिल्या. जनतेला आवाहन आणि शुभेच्छा देत असताना रात्र केव्हा सरली हे त्यांनाच कळले नाही.पहाट होतानाच त्यांनी आपले घर गाठले.राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी राज्यावर आलेल्या संकटाच्या काळात जनतेला केलेल्या आवाहनामुळे जनतेने घरातच राहून ईद साजरी केली.