मुंबई नगरी टीम
मुंबई : परराज्यातील मजूरांना त्यांच्या राज्यात घेवून जाणा-या रेल्वे गाड्या सोडण्यावरून केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि राज्य सरकारमध्ये चांगलीच जुंपली आहे.गोयल यांचे पश्चिम बंगाल साठी सोडण्यात आलेल्या विशेष श्रमिक रेल्वेगाड्यांबाबतचे विधान हे पूर्णपणे दिशाभूल करणारे असून, वस्तुस्थितीला धरून नाही,अशी टीका राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.
पश्चिम बंगाल चे मुख्य सचिव राजीव सिन्हा यांनी केंद्रीय रेल्वे प्रशासनास २२ मे रोजी पत्र लिहून असे कळविले होते की, २६ मे पर्यंत पश्चिम बंगालमध्ये कोणतीही रेल्वेगाडी पाठविण्यात येऊ नये. असे असताना देखील रेल्वे प्रशासनाने त्या पत्राकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून महाराष्ट्राची फजिती व्हावी, तारांबळ उडावी, यासाठी ३४ गाड्या काल दि.२६ रोजी महाराष्ट्रात पाठवल्या.अशाप्रकारे महाराष्ट्राची फसवणूक करून केंद्रीय मंत्री पियुष गोयल बाहेर सांगत आहेत की, आम्ही महाराष्ट्रात गाड्या पाठवल्या, परंतु महाराष्ट्र सरकारने त्यात श्रमिकांना भरून त्या पश्चिम बंगालला पाठवल्या नाहीत. हे विधान पूर्णतः चुकीचे व दिशाभूल करणारे आहे. माझी श्री. गोयल यांना विनंती आहे की, कृपया कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण अशा प्रकारचे राजकारण करू नये. आपणही महाराष्ट्राचे सुपुत्र आहात. याचा विसर पडू देऊ नये असेही देशमुख यांनी गोयल यांना सुनावले आहे.