३० जून पर्यंत लॉकडाउन ; ८ जूनपासून हॉटेल,रेस्टॉरंट सुरु होणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : देशात येत्या ३० जून पर्यंत लॉकडाउन वाढविण्यात आला असून,या संदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाने आज नवीन मार्गदर्शकतत्वे जारी केली आहेत.पाचवा लॉकडाउन फक्त कन्टेन्मेन्ट झोनपुरता मर्यादीत राहणार आहे.तर टप्याटप्याने सर्व आर्थिक व्यवहार सुरु करण्यात येणार आहेत.येत्या ८ जूनपासून काही बाबी शिथिल करण्यात येणार आहेत.त्यानुसार धार्मिक स्थळे, मॉल्स, हॉटेल्स सुरू करण्यात येणार आहे.मात्र सामाजिक अंतराचे  पालन करणे अनिवार्य असणार आहे. येत्या ३० जून पर्यंत फक्त कन्टेन्मेन्ट झोनमध्ये लॉकडाउन कायम राहिल असेही यामध्ये स्पष्ट केले आहे.

चौथ्या लॉकडाउनचा कालावधी उद्या रविवारी संपत आहे.या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय गृहमंत्रालयाने नवीन मार्गदर्शकतत्वे जारी केली आहेत.त्यानुसार येत्या ३० जून पर्यंत कन्टेन्मेन्ट झोनमध्ये लॉकडाउन कायम राहणार आहे.कन्टेन्मेन्ट झोनमध्ये लॉकडाउन अधिक कठोर करण्यात आला असला तरी अत्यावश्यक गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे.पहिल्या टप्प्यात म्हणजेच येत्या आठ जूनपासून धार्मिक, प्रार्थना स्थळे खुली करण्याबरोबरच हॉटेल,रेस्टॉरंट शॉपिंग मॉल उघडणार आहेत.दुसऱ्या टप्प्यात शाळा,कॉलेज,शैक्षणिक संस्था,कोचिंग,क्लास राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांबरोबर चर्चा करुन उघडण्यात येणार आहेत.तसेच प्रत्येक राज्यात असणा-या परिस्थितीनुसार तिसऱ्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास, मेट्रो रेल्वे,सिनेमा हॉल,जीम, मनोरंजन उद्याने,जलतरण तलाव, थिएटर, बार, हॉल, या गोष्टी कधी सुरु करण्याबाबत त्या संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.तसेच क्रीडा,मनोरंजन,धार्मिक कार्यक्रम आणि अन्य कार्यक्रमांना परवानगी देण्यासंदर्भातही निर्णय घेण्यात येईल.

पाचव्या लॉकडाउनमध्ये संचारबंदीची वेळ कमी करण्यात आली आहे.रात्री ९ वाजेपासून सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. शाळा,कॉलेज सुरु करण्याबाबतचा निर्णय जुलै महिन्यात घेतला जाणार आहे.कटेंनमेंट झोनच्या सीमा निश्चित करण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.राज्यातर्गत वाहतुकीवर बंदी नसली तरी वाहतूक नियंत्रित करण्याचे अधिकार राज्यांना देण्यात आले आहेत. ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती, गरोदर महिला, आजारी व्यक्ती, लहान मुले यांना घरात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Previous articleअभिनेता सोनू सूदच्या कार्याचे राज्यपालांनी केले कौतुक
Next articleआता प्रवासासाठी ई-पासची गरज नाही; मात्र निर्णय राज्य सरकार घेणार