“निसर्ग” चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकणासाठी विशेष आर्थिक पॅकेज द्या

मुंबई नगरी टीम

मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना  निवेदन देवून कोकणासाठी ‘विशेष आर्थिक पॅकेज’ देण्याची मागणी केली आहे.

या चक्रीवादळाने घरे, फळबागा, पिके, मत्स्यव्यवसायिकांच्या बोटी, वाहने, गणेशमूर्तीकार, विद्युत तारा, छोटे-मोठे व्यापारी, टपरीधारक व इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.या चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यातील मुरूड येथे लॅण्डफॉल केलेले असल्याने जिल्ह्यातील सर्व तालुके व वादळाच्या परिघातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातही घराचे पत्रे उडून अन्नधान्याचे तसेच घरगुती वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार अंदाजे ५ हजार कोटींचे नुकसान झाले आहे. तरी नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी शासनाने विशेष सर्वेक्षण करून ‘विशेष आर्थिक पॅकेज’ तातडीने जाहीर करावी अशी विनंती या निवेदनात खासदार तटकरे यांनी केली आहे.

Previous articleमुदत संपलेल्या १ हजार ५६६ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणार
Next articleआता येथील नागरिकांना जिल्ह्याअंतर्गत प्रवास करण्यास परवानगी