मुंबई नगरी टीम
मुंबई : कोरोना विषाणूंचा प्रसार राज्य शासकीय कार्यालयांमध्ये होऊ नये,तसेच शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती करण्यासाठी अधिकारी,कर्मचारी यांनी त्यांच्या घरातच राहूनही कार्यालयीन आवश्यकतेनुसार व तातडीनुसार शासकीय कामकाजाचा निपटारा करण्यासाठी शासकीय ईमेल,त्यांच्या नेहमीच्या वापरातील अन्य ईमेल तसेच व्हॉट्सअॅपचा वापर शासकीय कामकाजासाठी तसेच संबंधितांना सूचना आदेश देण्यासाठी करणे ग्राह्य धरण्यात येणार आहे.त्यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूंचा प्रसार राज्य शासकीय कार्यालयांमध्ये होऊ नये, तसेच राज्यातील अधिकारी, कर्मचारी यांना त्यांचा संसर्ग होऊ नये म्हणून विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्याच्या दृष्टीने सर्व विभागाना विविध सूचना करण्यात आलेल्या आहेत.लॉकडाऊनच्या कालावधीत राज्य शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती नियंत्रित करण्यात आली आहे. तसेच भविष्यातही अशा प्रकारची परिस्थिती लक्षात घेता शासकीय अधिकारी,कर्मचारी यांनी त्यांच्या घरातच राहूनही कार्यालयीन आवश्यकतेनुसार व तातडीनुसार शासकीय कामकाजाचा निपटारा करणेसाठी उपाययोजना करणे आवश्यक असल्याने आता शासकीय ईमेल (जसे एनआयसी मेल, इ.), त्यांच्या नेहमीच्या वापरातील अन्य ईमेल तसेच व्हॉट्सअॅपचा वापर शासकीय कामकाजासाठी तसेच संबंधितांना सूचना आदेश देण्यासाठी करणे ग्राह्य धरण्यात येईल.त्यानुसार या परिपत्रकाद्वारे राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक अधिकारी,कर्मचारी यांनी, त्यांचे शासकीय ई-मेल आयडी, त्यांच्या नेहमीच्या वापरातील अन्य ई-मेल आयडी तसेच एस.एम.एस व्हॉट्सअॅपची सुविधा असलेला मोबाईल क्रमांक, त्यांचे कार्यालय प्रमुखांस उपलब्ध करून द्यावा असेही आदेश देण्यात आले आहेत.
शासकीय कामकाजासाठी शासकीय ई-मेल आयडी, त्यांच्या नेहमीच्या वापरातील अन्य ईमेल आयडी तसेच व्हॉट्सअॅपचा वापर करून त्यांच्या कामाचा जास्तीत जास्त निपटारा करावा. प्रस्ताव ई-मेलद्वारे फॉरवर्ड केल्यानंतर त्याबाबतची सूचना लगेचच संबंधितांस एस.एम.एस, व्हॉट्सअॅपवरून, देण्याबाबत दक्षता घेण्यात यावी.या पद्धतीने वरिष्ठांकडून प्राप्त सूचनेनुसार ईमेलद्वारे अंतिम मान्यतेसाठी सादर केलेला प्रस्ताव (फॉरवर्ड केलेला प्रस्ताव ) हा, तो सादर करणारे व अंतिम मान्यता देणारे या दोन्ही स्तरामधील अधिकाऱ्यांनी पाहिला, तपासला व मान्य केला आहे, असे गृहित धरण्यात येणार आहे.प्रस्ताव तयार करणाऱ्या अधिकारी,कर्मचारी यांनी प्रस्ताव ई-मेलद्वारे अंतिमत: फॉरवर्ड करण्यापूर्वी तो सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून फॉरवर्ड करावा व त्याची प्रत (C.C. मध्ये) सर्व संबंधित अधिकाऱ्यांना चिन्हांकित करावी.असा सूचना देण्यात आल्या आहेत.