मुंबई नगरी टीम
औरंगाबाद : कोरोनाच्या काळात राज्य सरकारने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना महात्मा फुले जनारोग्य योजनेतंर्गंत समाविष्ट करण्यात येईल असा निर्णय घेतला होता .मात्र,प्रत्यक्षात तसे घडले नसून सर्व सामान्य गोरगरीब जनतेला लाखोंची अवाजवी बिल देऊन त्यांची लूट केली जात आहे. सर्वसामान्य जनतेवर अन्याय होत असून ज्या रुग्णांनी २५ हजार पासून १० लाख ते १५ लाख रक्कमेची बिल भरली आहेत त्यांच्या बिलांची परतफेड तातडीने व्हावी अशी स्पष्ट भूमिका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी मांडली. तसेच खाजगी रुग्णालयांमध्येही कोरोनाच्या रुग्णांकडून लूट करून जी बिले वसूल केली आहेत ती बिले राज्य शासनाने परत करावी यासाठी आम्ही टोकाचा आग्रह धरणार असून प्रसंगी आंदोलन करावे लागले तरीही रस्त्यावर उतरु असा जोरदार पवित्रा दरेकर यांनी आज औरंगाबाद मध्ये दिला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद हे संवेदनशील शहर म्हणून समोर आहे. तरी,कोरोनाची परिस्थिती व उपाययोजना पुरेशा आहेत का, रूग्णालय उपलब्ध आहेत का, रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर, ऑक्सिजन मनुष्यबळ आहे का याची तपशीलवार माहिती घेण्यासाठी श्री. दरेकर यांनी आज औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात औरंगाबाद जिल्हाधिकारी, आयुक्त, वैद्यकीय अधिकारी यांच्याशी सविस्तर बैठक घेऊन चर्चा केली व आढावा घेतला. त्यानंतर दरेकर यांनी पत्रकरांशी संवाद साधला. यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्यसभा खासदार डॉ.भागवत कराड, माजी मंत्री अतुल सावे, आमदार प्रशांत बंब, प्रदेश प्रवक्ते शिरिष बराळकर, शहर जिल्हाध्यक्ष संजय केणेकर,ग्रामीण अध्यक्ष विजय अवताडे सरचिटणीस विजय औटी, अल्पसंख्याक उपाध्यक्ष इजाद देशमुख, जिल्हाउपाध्यक्ष संजय अंबाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दरेकर यांनी यावेळी कोरोनाच्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने काय केले याचा लेखाजोखा आणि तपशीलवार आकडेवारी जाहीर केली. दरेकर म्हणाले की, कोरोनाचाप्रत्येक रुग्ण हा महात्मा फुले जन आरोग्य योजने मध्ये समाविष्ट केला जाईल असे राज्य सरकारने जाहीर केले होते. तरी खाजगी रुग्णालय अवाजवी पैसे आकारतात. त्या पार्श्वभूमीवर मुंबई शेकडो उदाहरणे देता येतील. मुंबईमधील बोरिवली येथे सलीम शेख नावाच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला ९ लाख ६० हजार रुपयांचे बिल तर कांदिवली येथील रुग्णाला पावणे दोन लाखांचे बिल आकारण्यात आले. सामान्य लोक हे बिल भरू शकत नाहीत. ही परिस्थिती केवळ मुंबईत नसून ठाणे, नगर आणि औरंगाबाद येथेही निदर्शनास आली आले. हा सर्वसामान्यांवर केलेला अन्याय आहे. तरी, यापुढे जे खासगी रुग्णालयात जातील त्यांना तात्काळ जेथे ॲडमिट आहेत तेथे जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार करण्यात यावेत किंवा स्पेशल इंडिव्हिज्युअल केस म्हणून जन आरोग्य मध्ये सामावून घ्यावे, अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचे श्री दरेकर यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी दरेकर यांनी सांगितले की, औरंगाबाद येथे मनुष्यबळाचा अभाव आहे. जाहिराती देऊनही डॉक्टर उपलब्ध होत नाही. मुंबईला डॉक्टरांना जास्त पैसे दिले जातात तरी यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्याची सूचना दरेकर यांनी दिल्या.सामना वृत्तपत्रामधून विरोधी पक्षावर वारंवार टीका होते. याबाबत बोलताना दरेकर म्हणाले, संजय राऊत हे चर्चेत राहण्यासाठी काय बोलतील आणि काय अग्रलेख लिहितील याचा नेम नाही. ते कधी राज्यपालांवर टीका करतात नंतर तेच जाऊन राज्यपाल चांगले व्यक्तिमत्व आहेत सांगून त्यांचे कौतुक करतात व त्यांना नमस्कारही करतात. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करून त्यांचीही प्रशंसा करतात, त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊ नये.हा प्रकार केवळ लक्ष विचलित करण्यासाठी होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यात आज कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून मृत्यू दरही वाढतोय.रुग्णांचा कधी रुग्णवाहिका नसल्याने मृत्यू होतो, तर रुग्णालयाच्या दारात नेल्यावर ऑक्सिजन लावायला बेड नसल्याने मृत्यू होतो तर कधी व्हेंटिलेटर नसल्याने रुग्ण दगावतो. केवळ व्यवस्था उभी नाही म्हणून बऱ्याच अंशी मृत्यू झाल्याचे लक्षात येते. अशाप्रकारे,मुंबईतील वाढत्या कोरोना प्रादूर्भावला प्रशासनाचा हेळसांडपणा आणि निष्काळजीपणा कारणीभूत आहे. राज्य सरकार कोरोनाचे खरे आकडे लपवित असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला. आकडे लपविण्याच्या नादात आज लोकांचे जीव जात आहेत. धारावीत आजही कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पण सरकार कोरोनाच्या तपासणींची संख्या कमी करित आहेत, त्यामुळे बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महाविकास सरकारमध्ये विसंवाद असून सरकारमधील तीन पक्षात एकमत नाही त्यांनी कधीही सामुदायिक बसून चर्चा केलेली नाही किंवा विरोधी पक्षाला विश्वासात घेतले नाही त्यामुळेच राज्यात ही कोरोनाची परिस्थिती अधिक गंभीर झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
कोरोनाची परिस्थिती हाताळताना केंद्र सरकारने काय केली अशी ओरड होत असून त्यावर बोलताना दरेकर म्हणाले,पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला एक खंबीर प्रधानमंत्री लाभला.कोरना सारखे संकट देशात आले असताना आज देश मोदींच्या शब्दावर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून ताकदीने उभा आहे. त्यांच्या नेतृत्वात हा देश या संकटातून बाहेर येईल. आत्मनिर्भर या संकल्पनेच्या माध्यमातून देश पुन्हा उभा राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशातील आर्थिक व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून उद्योग धंदा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणूनच एमएसएमइ च्या माध्यमातून सूक्ष्म, मध्यम, लघु उद्योगांसाठी भरीव मदत करण्यात आली आहे. साधारणतः ३ लाख कोटींचे भांडवल उभे करण्यात आले असून ५० हजार कोटींची तरतूद केली आहे.त्यामुळे देशातील उद्योगधंदे सुरळीत करण्यासाठी एमएसएमइ च्या माध्यमातून उद्योगधंद्यांना मोठ्याप्रमाणावर दिलासा आणि आधार देण्यात आला आहे. छोटे उद्योगधंदे करणाऱ्यांना दहा हजार देण्यात येणार आहेत. अशाप्रकारे विविध उपाययोजना आखून अर्थव्यवस्थेचा गाडा सुरळीत करण्यासाठी व दिलासा देण्यासाठी जी काही गरज आहे ती मदत आणि दिलासा देण्याचे काम केंद्र सरकारने केल्याचेही श्री.दरेकर यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील एक वर्षपूर्ती निमित्ताने पक्षाच्या सर्व सदस्यांनी पक्षाने केलेल्या कार्याची माहिती देण्यासाठी कार्यक्रम आखला आहे. त्याची माहितीही दरेकर यांनी यावेळी दिली. कोरोनाचा प्रभावी मुकाबला, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची यशस्वी अंमलबजावणी, आत्मनिर्भर भारतासाठी कल्पक उपाययोजना आणि देशातील अनेक दशकांच्या समस्या सोडविणारे ऐतिहासिक निर्णय हे या वर्षाचे वैशिष्ट्य आहे, असेही प्रविण दरेकर यांनी सांगितले.विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयातील कोरोना सेंटरची पाहणी केली. तेथील वैदयकीय व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला.