सरकार तुमच्यासोबत आहे; शरद पवारांचा कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा

मुंबई नगरी टीम

मुंबई : ‘निसर्ग’ चक्रीवादळाने कोकणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून या नुकसानीच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हे आजपासून कोकण दौ-यावर आहेत. रायगड जिल्ह्यातील माणगावपासून नुकसान पाहणीची त्यांनी सुरुवात केली.स्थानिकांनी तातडीने वीज पुरवठा सुरू करण्याची व विभागात झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी केली. असता शरद पवार यांनी कोकणातील शेतकऱ्यांना सरकार तुमच्यासोबत आहे असा दिलासाही दिला.

‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या कोकणाच्या दोन दिवसाच्या दौ-यावर असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज माणगाव येथे भेट देवून बाजारपेठेची पाहणी केली. त्यानंतर म्हसळा येथील मदरशाला भेट देत नुकसानीची माहिती घेतली.म्हसळा येथे मोठ्या प्रमाणात शेडचे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी पवार यांनी केली तसेच स्थानिकांकडून माहिती घेतली. याशिवाय म्हसळा मधील रुग्णालयाचे वादळामुळे मोठे नुकसान झाले होते त्याचीही पवार यांनी पाहणी केली. दिवेआगारचे सरपंच उदय बापट यांच्या चिकू,नारळ बागेचीही पाहणी केली. तसेच त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. शरद पवार यांच्या पाहणी प्रवासात रस्त्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याचे चित्र दिसून आले तसेच वीजेचे खांब पडल्याचे चित्र होते. श्रीवर्धन, हरिहरेश्वर या नुकसानग्रस्त भागाचीही पाहणी केली. जीवना बंदर येथील रहिवाशांनी आपल्या व्यथा पवारसाहेबांसमोर मांडल्या. त्यात तातडीने वीज पुरवठा सुरू करण्याची व विभागात झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी केली. यावेळी पवार यांनी कोकणातील शेतकऱ्यांना सरकार तुमच्यासोबत आहे असा दिलासा दिला.श्रीवर्धन येथे आमदार,खासदार आणि अधिकारी यांच्यासमवेत सायंकाळी एक बैठक घेऊन अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे योग्यरीत्या करुन जास्तीत जास्त भरपाई कशी मिळेल यासाठीच्या सूचना केल्या. बुधवारी सकाळी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीकडे रवाना होणार आहेत.बुधवारी दापोली, मंडणगड येथील नुकसानीची पाहणी करणार आहेत.

Previous articleउदय सामंत यांच्या प्रयत्नांना यश ; रत्नागिरीत होणार वैद्यकीय महाविद्यालय
Next articleकोकणवासियांना तात्काळ १५ हजार रुपयांची मदत द्या : प्रवीण दरेकर