मुंबई नगरी टीम
मुंबई :कोरोना विषाणूच्या जागतिक महामारीमुळे संपूर्ण भारतात २३ मार्च पासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.मुंबईतील उद्योग व्यवसाय या टाळेबंदीच्या काळात पूर्ण बंद आहेत.दुकाने व कार्यालये बंद राहिल्याने व्यावसायिकांना या काळात प्रचंड नुकसान सोसावे लागले आहे.तसेच अनेक नागरिकांचा पगार किंवा उत्पन्नाचे साधन बंद झाले असल्याने कोरोनाकाळातील विजबिले कमी करण्याची मागणी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे.
या संकटात मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमाने लोकांना गतवर्षीच्या विजवापराच्या सरासरीने वीज देयके पाठवली आहेत.नुकसानीत असलेल्या व्यावसायिकांना आणि उत्पन्नाचे साधन हरवलेल्या नागरिकांना हे संपूर्ण रकमेचे वीज देयक भरायला लावणे हा अन्याय आहे. त्यामुळे कोरोना महामारीच्या काळातील व्यावसायिक आणि घरगुती वापराची वीज देयके ही किमान रकमेनुसार आकारावीत अशी मागणी आज मुंबई भाजपाकडून करण्यात आली आहे. वीज देयकात सवलत मिळाल्यास अडचणीत आलेल्या व्यावसायिक आणि नागरिकांना सावरण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने या गंभीर विषयात तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. केंद्र सरकार नागरिकांना विविध सवलती देत असताना बेस्ट उपक्रमानेही वीज देयकात सवलत देऊन त्यात आपला वाटा उचलावा असेही आवाहन मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.
मुंबई भाजपचे अध्यक्ष लोढा यांनी बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांच्याशी आज दूरध्वनीवरून याविषयात चर्चा केली. मुंबईतील नागरिकांना वीज देयकांमध्ये तातडीने दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी बागडे यांच्याकडे केली आहे.