…आणि प्रविण दरेकरांच्या फोनची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल !

मुंबई नगरी टीम

मुंबई : विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज बोरिवलीतील भगवती रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर त्यांनी उपस्थित केलेल्या विषयांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दखल घेतली आहे.मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष नेते दरेकर यांना दूरध्वनी केला व त्यांच्याशी रुग्णालयातील समस्येविषयी चर्चा केली.भगवती रुग्णालयातील ती इंजेक्शन उपलब्ध करुन देण्याची विनंती दरेकर यांनी केल्यानंतर इंजेक्शन तातडीने उपलब्ध करुन देण्यात येतील असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती दरेकर यांनी दिली.

विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी आज सकाळी बोरिवली येथील भगवती महानगरपालिका रुग्णालयाला भेट दिली. यावेळी दरेकर यांनी रुग्णालयातील ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, उपलब्ध खाटा, उपलब्ध औषधे व इंजेक्शनचा आदी आरोग्य यंत्रणांची माहिती घेऊन येथील आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली.बोरिवली येथील भगवती रुग्णालयात गेले दोन वर्षापासून बंद असलेला आयसीयु विभाग येत्या सोमवारपर्यंत तात्काळ सुरू करण्यात येणार असून तेथे तातडीने बेड उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी  दिली. तसेच रुग्णालयात सध्या तुटवडा असलेली इंजेक्शन सुध्दा तातडीने उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिल्याची माहितीही दरकेर यांनी यावेळी दिली. रुग्णालयातील आयसीयु विभाग तातडीने सुरु करण्याची मागणी दरेकर यांनी आयुक्त इक्बाल चहल यांच्याकडे दूरध्वनी वरुन केल्यानंतर सोमवारपासून रुग्णालयाचा आयसीयु विभाग सुरु करण्यात येईल असे आयुक्त चहल यांनी स्पष्ट केले आहे.

दरेकर म्हणाले की, मुंबईमध्ये खास करून उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट सुरू आहे. यासाठी सरकारी रुग्णालय आणि महापालिका रुग्णालयांमधील अपुरी व्यवस्था हे मुख्य कारण आहे. जर सरकारी रुग्णालय आणि महापालिका रुग्णालये अद्यावत यंत्रसामुग्रीसह सुसज्ज ठेवली तर खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण जाणार नाही. पण बोरीवलीत मोठ्या प्रमाणात रुग्णांकडून लूट होताना दिसत आहे. भगवती रुग्णालयात दोन वर्षांपासून सर्व साहित्य आणि यंत्र खरेदी करूनही येथील आयसीयु बेड विभाग सुरू झाले नसल्याचा आरोप दरेकर यांनी केला. एका बाजूला जनतेचा पैसा दोन वर्ष त्या मशीनवर खर्च केला त्याचे सोयरसुतक कोणालाही नाही. गेले दोन वर्ष यंत्रणा उपलब्ध असताना सुध्द हा विभाग सुरू करण्यात आला नाही, हा महापालिकेचा निष्काळजीपणा आहे. या सर्व गोष्टी आजच्या भेटी दरम्यान प्रशासनाच्या निदर्शनास आणल्या व तातडीने आयुक्तांशी संर्पक साधला. स्थानिक आमदार मनीषा चौधरी यांनी ६ जून २०२० रोजी संबंधित विषयावर लक्ष वेधण्यासाठी पत्र दिले होते. त्यालाही प्रशासनाकडून प्रतिसाद मिळाला नाही. एखादा आमदार जेव्हा दहा ते पंधरा दिवस आधी या गंभीर विषयावर लक्ष वेधतो त्याची साधी दखलही घेता येत नसेल तर हे दुर्दैव म्हणावे लागेल. त्यामुळे रुग्णालयात जो विस्कळीतपणा आणि हेळसांडपणा झाला आहे तो अशाच बेजबाबदार व्यवस्थेमुळे झाल्याची टीका दरेकर यांनी केली.

कोणत्याही परिस्थितीत येत्या सोमवारी भगवती रुग्णालयातील आयसीयू विभाग सुरू व्हावे असे अधिकाऱ्यांना आणि आयुक्तांना सांगितले आहे.  त्यानंतर सोमवारी हे विभाग सुरू करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. सनदी अधिकारी मनीषा म्हैसकर यांनी तशा प्रकारच्या सूचना दिल्या असून संबंधित अधिकाऱ्यांनाही आदेश देण्यात आले आहेत. हा विभाग सोमवारी सुरू होईल. यामध्ये आणखी दहा बेड वाढविण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले. भगवती रुग्णालयात टॉसीझिलीझॅप या इंजेक्शनचा तुटवडा आहे . उपनगरात १ हजार इंजेक्शनची आवश्यकता असताना आज फक्त ४५ इंजेक्शन उपलब्ध आहेत. त्यामुळे हे इंजेक्शन उपलब्ध करण्याची मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये प्रधानमंत्र्यांना हे इंजेक्शन उपलब्ध व्हावे ही बाब निदर्शनास आणल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले. पण इंजेक्शनासाठी पंतप्रधानांना सांगावे लागत आहे हे दुर्दैवी आहे. या इंजेक्शनची किंमत सुमारे ४० हजार रुपये असून हे इंजेक्शन रुग्णालयात उपलब्ध नसल्याचे सांगितले जात असतानाही आमदार मनिषा चौधरी यांनी ते इंजेक्शन बाजारातून उपलब्ध करुन दिले. याचा अर्थ या इंजेक्शनचा काळाबाजार होत आहे अथवा जाणीवपूर्वक साठवणूक केली जातेय का याचीही चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी दरेकर यांनी केली.

भगवती रुग्णालयात रेमेडीसीवर्ड या टॅबलेटचा तुटवडा असून ही टॅबलेट अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मान्यतेसाठी थांबविण्यात आल्याचे सांगण्यात आले. कोरोना सारखी गंभीर परिस्थिती असताना अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मान्यतेसाठी का थांबावे लागत आहे. त्यामुळे यासंदर्भात तात्काळ अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याशी बोललो. त्यांनी या टॅबलेटची नोंद करून घेतली असून ही टॅबलेट तात्काळ उपलब्ध करुन देण्याचे मान्य केल्याची माहिती दरेकर यांनी यावेळी दिली.

Previous articleलॉकडाऊनमध्ये शिवभोजन थाळीने दिला सर्वसामान्य नागरिकांना आधार  
Next articleकोरोनाशी लढा देणा-या धनंजय मुंडेंनी रुग्णालयातून सादर केला लेखाजोखा