मुंबई नगरी टीम
मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोरोनासंदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ९९ हजार २८० पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले तसेच ६ लाख १९ हजार व्यक्तींना कॉरंटाईन करण्यात आले आहे.अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
राज्यात लॉकडाऊनच्या २२ मार्च ते २० जून या कालावधीत कलम १८८ नुसार १ लाख ३३ हजार ३११ गुन्हे नोंद झाले असून २७ हजार २६६ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ८ कोटी ३२ लाख २३ हजार ७११ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर कॉरंटाईन असा शिक्का मारला आहे अशा ७३४ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण ६ लाख १९ हजार ८१८ व्यक्ती कॉरंटाईन आहेत. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. पोलिसांवर हल्ला होण्याच्या २७५ घटना घडल्या. त्यात ८५४ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.
या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३३५ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ८३,४९७ वाहने जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील ३१ पोलीस व १ अधिकारी अशा एकूण ३२, पुणे ३, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३, ए.टी.एस. १, मुंबई रेल्वे २, ठाणे ग्रामीण २, जळगाव ग्रामीण१,पालघर १ अशा ४७ पोलिस बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.सध्या ११८ पोलीस अधिकारी व ८८३ पोलीस कोरोना बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.राज्यात सध्या एकूण १०९ रिलिफ कँम्प आहेत. त्या ठिकाणी जवळपास ३,५४८ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.