मुंबई नगरी टीम
मुंबई : पोपट फेम आणि भीम गीते,लोक गीतांसाठी प्रसिद्ध असलेले गायक आनंद शिंदे यांना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर संधी मिळण्याची शक्यता आहे.गायक आनंद शिंदे यांनी कालच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने राष्ट्रवादीकडून त्यांनी संधी दिली जाणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ जागा रिक्त झाल्याने या जागांवर १२ नावांची लवकरच शिफारस करण्यात येणार आहे.साहित्य, कला, शास्त्र, सहकारी चळवळ,समाजसेवा या क्षेत्रात विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेल्या व्यक्तींनाच नामनिर्देशित केले जाते.राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारधील शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या वाट्याला येणा-या जागांसाठी आता राज्यपालांच्या निकषात बसणा-याच उमेदवारांची शोधाशोध सुरू झाली आहे.शेतक-यांच्या हक्कासाठी लढणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना विधान परिषदेवर संधी दिली जाणार असल्याचे जवळ जवळ निश्चित झाले आहे.तर राष्ट्रवादीकडून दुस-या जागेसाठी प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या नावाची चर्चा असल्याचे समजते.कालच आनंद शिंदे शिंदे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने त्यांना राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवर संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.
प्रख्यात गायक प्रल्हाद शिंदे यांच्याकडून मिळालेला लोकसंगीताचा वारसा आनंद शिंदे यांनी जोमाने पुढे चालवला आहे.वडिलांसोबत कोरसमध्ये गाणारा मुलगा ते महाराष्ट्राचा बुलंद आवाज या ४० वर्षांचा गायकीचा प्रवास करणा-या आनंद शिंदे यांची गाणी चित्रपटसृष्टी ते बॉलीवूडपर्यंत प्रसिद्ध आहेत.आनंद प्रल्हाद शिंदे हे एक मराठी गायक आहेत.त्यांनी हजाराहून अधिक गाणी आणि २५० चित्रपटांत पार्श्वगायन केले आहे. शिंदे हे भीम गीते व लोक गीतांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहेत.त्यांना २०१९ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे.सध्या आनंद शिंदे यांच्यावर महाराष्ट्र स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आहे.आतापर्यंत आरपीआयच्या नेत्यांनी लहान मोठ्या कलाकारांचा फक्त वापर केल्याचा आरोप त्यांनी केला होता.