खुशखबर : राज्यातील सलून व पार्लर लवकरच सुरू होणार

मुंबई नगरी टीम

गडचिरोली: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीत काही प्रमाणात शिथीलता देण्यात आली असली तरी राज्यातील सलून आणि पार्लर सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली नाही.त्यामुळे सलून आणि पार्लर बंद असल्याने राज्यातील नाभिक समाजाला  मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे.याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेे यांच्याशी चर्चा करण्यात आली असून,लवकरच राज्यातील सलून व पार्लर सुरु करण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे ओबीसी कल्याण, भूकंप, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज येथील पत्रकार परिषदेत दिली.

राज्यात कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात राज्य सरकारने शिथीलता देवून काही दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी कोरोनाचा फैलाव होवू नये म्हणून राज्यातील सलून आणि पार्लर सुरू करण्याची परवानगी दिली नाही.राज्यातील सलून आणि पार्लर बंद असल्याने नाभिक समाजाला  मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे.काही ठिकाणी नाभिक समाजाने आंदोलनही केली आहेत.तर दुकाने सुरू करण्याची परवानगी द्या अथवा आर्थिक मदत द्या अशी मागणी करण्यात आली आहे.मात्र आता राज्यातील सलून आणि पार्लर सुरू होण्याची शक्यता आहे.तसे स्पष्ट संकेत राज्याचे ओबीसी कल्याण, भूकंप, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.व्यवसाय बुडाल्याने राज्यभरातील नाभिक समाजाला बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सर्व सलून व पार्लर सुरु करण्याचा सरकारचा मानस आहे. यासंदर्भात येत्या आठवडाभरात सरकार निर्णय घेणार आहे. परंतु सलून सुरु झाल्यानंतर सामाजिक अंतर व अन्य अटींचे पालन करावेच लागेल, असे मंत्री वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

Previous articleसंजय राऊतांची छाती फाडली तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार दोघेही दिसतील
Next articleराजकीय इच्छाशक्ती आणि समन्वया अभावी कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे थैमान