मुंबई नगरी टीम
कल्याण : राज्यात शिवसेनेची सत्ता, ठाण्यात शिवसेनेचे मंत्री, कल्याणमध्ये शिवसेनेचे खासदार, आमदार, महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता एवढे सगळे असूनही केवळ राजकीय इच्छाशक्ती आणि समन्वया अभावी आज कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. मात्र येत्या ८ दिवसांत कल्याण डोंबिवलीतील कोरोनाची परिस्थिती सुधारली नाही, तर भाजप आक्रमक भूमिका घेईल असा इशारा विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिला आहे.
कल्याण डोंबिवलीतील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज महापालिका आयुक्त आयुक्त विजय सुर्यवंशी यांच्या सोबत आढावा बैठक घेतली व तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.डोबिंवलीतील शास्त्रीनगर नगरपालिका रुग्णालय हे कल्याण-डोंबिवलीतील सर्व सामान्य गोरगरिब जनतेचं रुग्णालय असून या मोठ्या रुग्णालयात फक्त दोन व्हेंटिलेटर उपलब्ध असून त्यापैकी एक नादुरुस्त होते. तसेच जाहिरात आणि चांगला पगार देऊनही रुग्णालयात फिजिशियन उपलब्ध होत नाही. त्यामुळे शासनाने प्रतिनियुक्तीवर फिजिशयन आणि व्हेंटिलेटर उपलब्ध करुन द्यावे यासाठी दरेकर यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला.त्यानंतर, शास्त्रीनगर नगरपालिका रुग्णालयासाठी प्रतिनियुक्तीवर फिजिशयन आणि चार ते पाच व्हेंटिलेटर तात्काळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्याची माहिती दरेकर यांनी यावेळी दिली.
दरेकर यांनी पालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयालाही भेट देऊन पाहणी केली. तसेच टाटा आमंत्रा येथील क्वारांटाईन सेंटरलाही दरेकर यांनी भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना दरेकर यांनी सांगितले की, आजच्या परिस्थितीमध्ये कल्याण डोंबिवलीकर खूप भोगत आहेत. हॉस्पिटलमधील व्यवस्था आणि समन्वयाच्या अभावाने कल्याण डोंबिवलीत मृत्यू वाढत चालले आहेत. महानगरपालिका आणि इथल्या राजकीय नेतृत्वामध्ये ताळमेळ नाही. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसाठी जास्त निधी लागत नाही. मात्र तेव्हढे देखील ही महापालिका उपाययोजना करू शकत नाही हे सत्ताधाऱ्यांचे अपयश असल्याची टिकाही विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी यावेळी केली. रुग्णालयातील अपुरी वैदयकीय व्यवस्था तसेच कोरोना रोखण्यासाठी अपुरे मनुष्यबळ आदी सर्व मुद्द्यांबाबत आजच्या बैठकीत महापालिका आयुक्तांशी चर्चा करण्यात आली आहे. त्याबद्दल आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पण येत्या ८ दिवसांत आम्हाला कल्याण डोंबिवलीच्या परिस्थितीत बदल दिसला नाही तर भाजपतर्फे उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दरेकर यांनी यावेळी दिला.
पर्यवरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघाच्या उपाययोजनांबाबत स्पेशल केस म्हणून एक न्याय आणि कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या ठाणे, कल्याण डोंबिवलीमध्ये दुसरा न्याय, असा दुजाभाव का असा सवालही त्यांनी यावेळी केला. शास्त्रीनगर नगरपालिका रुग्णालयाची पाहणी करत असताना एक विदारक चित्र डोळ्यासमोर उभे राहिलं.त्यामुळे इथल्या रुग्णांना काय भोगावे लागतय हे पाहता आलं. कल्याण-डोंबिवलीसाठी इतकं मोठं रुग्णालय असताना येथे फक्त दोन व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत.या दोन व्हेंटिलेटरपैकी एक व्हेंटिलेटर नादुरुस्त आहे. फिजिशियन नसल्यामुळे व्हेंटिलेटर उपलब्ध नाही. फिजिशियनसाठी जाहिरात देऊन व दोन लाख रुपये वेतन देऊनही कोणी यायला तयार होत नसल्याचे समजले. तरी,तात्काळ फिजिशियन उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आरोग्यमंत्र्यांना फोन करुन केली असल्याचे श्री.दरेकर यांनी स्पष्ट केले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एसएमएस द्वारे सूचित केले आहे. त्यामुळे प्रतिनियुक्तीवर फिजिशियन देण्यात येईल व लवकरच चार ते पाच व्हेंटिलेटर उपलब्ध करत असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी आश्वासन दिल्याची माहितीही दरेकर यांनी दिली.