मुंबई नगरी टीम
मुंबई : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीचे नेते,कार्यकर्ते आक्रमक झाले असून,काही ठिकाणी पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आले. तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी पडळकर यांचा खरपूस समाचार घेत गंभीर इशारा दिला आहे.
राष्ट्रवादीचे शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे अशी टीका भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केला आहे, असा आरोपही पडळकर यांनी केला आहे.पवार हे धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सकारात्मक नसून फक्त राजकारण करत असल्याचा आरोप आ.पडळकर यांनी आज पंढरपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केल्यानंतर त्यांचे पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे.पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करीत बीडमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली आ.पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत आणि प्रतिमा जाळत आंदोलन करण्यात आले. तर ‘मी देवेंद्र फडणवीस यांचा मुर्ख गुलाम’ अशा आशयाचे पोस्टरवर लिहून त्यावरील आ. पडळकर यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादी युवकांनी जोडे मारत आणि जोरदार घोषणाबाजी करत शिरुर येथे हे आंदोलन करण्यात आले.
पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी निषेध व्यक्त करीत पडळकर यांना गंभीर परिणामांना सामोरं जावे लागेल असा इशाराही दिला आहे.शरद पवारांच्या पायाच्या धुळीची लायकी नसलेल्या माणसाने त्यांच्यावर टीका करावी हे हसण्यासारखे आहे अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.राजकारणात नेम आणि फेम मिळवायचे असले की शरद पवार यांच्यावर टीका करायची हे समजून अनेकजण उचलली जीभ लावली टाळ्याला या उचापती करतात. सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न न करता डिपॉझिट, अस्तित्व टिकून राहील,देवांच्या खोट्या शपथा घ्याव्या लागणार नाही, हे पहावे. बिरोबा यांना सद्बुद्धी देवो! अशा शब्दात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आ.पडळकरांचा समाचार घेतला आहे.महाबुध्दीवान… महानिष्ठावान… पक्ष बदलण्याचा अनुभव असलेले गोपीचंद पडळकर हे सडक्या मानसिकतेचा कीडा आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.बहुजनांच्या पाठीत खंजीर खुपसणारे पडळकर यांनी शरद पवारांवर टीका करणे योग्य नाही. आधी बहुजन वर्गासाठी काय केले याचे आत्मपरीक्षण पडळकर यांनी करावे असे आव्हानही तपासे यांनी दिले आहे.सत्तेसाठी धर्मवादी पक्षासोबत गेलात आणि बहुजनांचा विश्वासघात केलात असा थेट आरोपही तपासे यांनी केला आहे.