सलून सुरु होणार पण केवळ केस कापण्यास परवानगी,दाढीसाठी परवानगी नाही

मुंबई नगरी टीम

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे गेली तीन महिने बंद असलेले सलून सुरू करण्यास अखेर राज्य सरकारने परवानगी दिली आहे.विशेष म्हणजे येत्या आठवड्यापासून सुरू होणा-या सलून मध्ये केवळ केस कापण्यासाठी परवानगी देण्यात आली असून, दाढी करण्यासाठी परवानगी देण्यात आली नाही. येत्या दोन दिवसामध्ये याबाबत एक नियमावली तयार करण्यात येणार आहे. त्यांचे काटेकोर पालन सलून मालकाला आणि ग्राहकांना करावे लागणार आहे.

राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये राज्य सरकारने शिथील देवून व्यवसायिकांना दिलासा दिला मात्र दुसरीकडे राज्यातील सलून,स्पा आणि पार्लर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली नव्हती त्यामुळे राज्यातील नाभिक समाजामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती.व्यवसाय बंद असल्याने नाभिक समाज आर्थिक संकटात सापडला होता.आज राज्य सरकारने काही प्रमाणात या समाजाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या आठवड्यापासून राज्यातील सलून सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.मात्र  सलूनमध्ये केवळ केस कारण्यासाठीच परवानगी देण्यात आली आहे.सलून मध्ये दाढी करण्यासाठी परवानगी देण्यात आली नाही.थोडे दिवस निरीक्षण केल्यानंतर यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल असे शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले आहे.

परब म्हणाले की,२८ जूनपासून सलून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सलूनमध्ये फक्त केस कापणारा आणि केस कापून घेणारा दोघांनाही मास्क घालणे बंधनकारक असणार आहे. ब्युटीपार्लर,स्पा आणि जीमबाबत अद्याप काही निर्णय घेण्यात आलेला नाही. थोडे दिवस पाहणी करुन नंतर पुढील निर्णय घेतला जाईल असे परब यांनी स्पष्ट केले तर मुंबईसह राज्यातील व्यायामशाळा व केशकर्तनालये येत्या आठवड्याभरात सुरु होणार असून दोन दिवसांमध्ये याबाबतची नियमावली व मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली जाणार असल्याची माहिती मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.राज्य मंत्रीमंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीनंतर शेख पत्रकारांशी बोलत होते. शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य मंत्रीमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत राज्यातील व्यायायमशाळा व केशकर्तनालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याबातची नियमावली व मार्गदर्शक तत्त्वे शासन आखून देईल.ही नियमावली सर्व व्यायामशाळा व केशकर्तनालये मालकांसाठी बंधनकारक असेल.पुढील आठवड्यात राज्यातील  व्यायामशाळा व केशकर्तनालयं उघडण्याची परवानगी दिली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

Previous article१६ जुलैपासून वैद्यकीय परीक्षा सुरू होणार नाही
Next articleकोरोना उपचारासाठीची औषधे जुन अखेरीस जिल्ह्यात उपलब्ध होणार