मुंबई नगरी टीम
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनची मुदत येत्या ३० जूनला संपते आहे.मात्र राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता सध्या सुरू असलेला लॉकडाउन यपुढेही सुरू राहणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधताना स्पष्ट केले आहे.मात्र यापुढे सर्व असेच सुरु राहणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.आपली अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली आहे.अर्थचक्राला गती देण्यासाठी राज्यात काही गोष्टी सुरु करीत आहोत.सध्याच्या काळात सर्व सुरु केले म्हणून परिस्थिती सुरळीत झाली असे समजू नका नाहीतर कोरोन आ वासून बसला आहे असेही त्यांनी म्हटले आहे.राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार काळजीवाहू सरकार नाही मात्र महाराष्ट्राला तुमची काळजी आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनची मुदत येत्या ३० जून रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी आज संवाद साधला.लॉकडाउनची मुदत येत्या ३० जून रोजी संपत आहे.त्यामुळे पुढे काय हा प्रश्न तुमच्या मनात असेल. मात्र ३० जून नंतर लॉकडाउन उठणार नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. राज्यातील जनतेशी संवाद साधताना त्यांनी कोकणातील परिस्थितीसोबतच राज्यातील अनलॉकबाबत आणि राज्यातील सणांवर भाष्य केले. सध्या राज्यभरात अनलॉकची प्रक्रिया सुरु आहे.आजपासून राज्यभरातील सलून दुकानेही सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी मुखख्यमंत्र्यांनी बोगस बियाणांवरही भाष्य केले.बोगस बियाण्याच्या तक्रारी ग्रामीण भागातून आल्या आहेत,त्यामुळे शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट उभे आहे असे सांगतानाच राज्यात शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या तक्रारी आहेत. दोषींवर कठोर कारवाई करणार आणि नुकसान भरपाई मिळवून देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.३० तारखेनंतर आणखी काही सेवा सुरु होणार आहे मात्र बिनधास्त वावरु नका असेही आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.
एक जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिवस आहे त्यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी कोविड योद्ध्यांना नमन केले, तसेच माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिन असल्याने शेतकरी दिवस असल्याने त्यांनी शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या .कोणतीही भेट न घेता चर्चा न करता दहीहंडी उत्सव रद्द केला त्याबद्दल त्यांनी मंडळांचे अभिनंदन करतानाच,तुझा चमत्कार दाखव, कोरोनाचे संकट घालव, असे साकडं त्यांनी विठ्ठलाला घातले.मुख्यमंत्री म्हणून नाही तर तुमचा प्रतिनिधी म्हणून आषाढी वारीला जाणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.धोक्यापासून सावध करणे हे माझे कर्तव्य आहे, बाहेर पडलो की धोका आहेच. त्यामुळे सावध राहा,धोका टळला या भ्रमात राहू नका असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. लॉकडाऊनमध्ये आणखी शिथिलता आणणार असून, एक एक गोष्ट सुरू करत आहोत असेही त्यांनी सांगितले.
प्लाझ्मा थेरपीचा सर्वाधिक वापर करणारे पहिले राज्य कदाचित महाराष्ट्र ठरेल असे सांगताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, मार्चपासून करोनाचे संकट आल्यापासून आपण जे जे शस्त्र मिळेल ते घेऊन कोरोनाशी लढत आहोत. ट्रॅकिंग ट्रेसिंग असेल तेही करीत आहोत. चाचण्या वाढवत आहोत. उपचाराच्या बाबतीत जगाच्या बरोबरीने आपण चाललो आहोत.एक सूत भर सुद्धा आपण जगाच्या पाठीमागे नाही. कोणत्या देशात काय चालले आहे, या देशात काय चालले आहे. कोणते उपचार होत आहेत,कोणते औषधी आहेत यावर आपले लक्ष आहे. गेल्या आठवड्यामध्ये मला मेसेज आला की, डेक्सामेथाझोन हे नवीन औषध सापडले आहे. मी टास्क फोर्सच्या डॉक्टरांना फोन केला. ते म्हणाले उद्धवजी हे औषध आपण गेल्या दोन महिन्यांपासून आवश्यकतेनुसार वापरत आहोत. मग प्लाझा थेरपी मार्च एप्रिलपासून सुरू केली.आजपर्यंत दहा जणांवर आपण उपचार केले.
अशा संकटातही १६ हजार कोटींचे सामंजस्य करार परदेशी कंपन्यांसोबत महाराष्ट्राने केले, त्यांच्यासाठी दारे खुली केली, अर्थचक्र आणि भूमिपुत्रांना रोजगार सुरु राहिले पाहिजे असेही यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.डेंग्यू-मलेरिया सारखे आजार पावसाळ्यात पसरतात, आपला परिसर स्वच्छ ठेवा, टायर, नारळाच्या करवंट्या, अंड्याचे कवच, झाडे यात पाणी साचून डेंग्यूचा फैलाव, गरज नसताना बाहेर पडून स्वतः कोविडला बळी पडू नका असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. प्रधानमंत्री गरीब योजनेतून धान्य देण्याची मुदत ३० जूनला संपते असल्याने पंतप्रधानांकडे आणखी ३ महिने धान्य देण्यासाठी मुदतवाढ मागितली असल्याचे त्यांनी सांगितले.पीपीई किट आणि मास्क यांचा मुबलक साठा राज्यात असून,चेस द व्हायरस ही मुंबईत राबवलेली संकल्पना महाराष्ट्रभरात सुरु करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.