मुंबई नगरी टीम
सांगली: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूरमध्ये केलेले वादग्रस्त वक्तव्य आणि त्यानंतर धनगर- मराठा समाजात तयार झालेल्या तणावामागे मोठे राजकीय षढयंत्र आहे.या प्रकरणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचा स्पष्ट सहभाग दिसतो आहे. त्यामुळे पडळकरांबरोबर या दोन्ही नेत्यांची चौकशी करावी, अशी मागणी धनगर विवेक जाग्रती अभियानचे संयोजक विक्रम ढोणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहराज्यामंत्री शंभुराज देसाई आणि कोल्हापूर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्याकडे केली आहे.
ढोणे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, पडळकर यांनी २४ जून रोजी पंढरपूर येथे पत्रकारांशी बोलताना ‘शरद पवार महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे’ असे वादग्रस्त विधान केले.या विधानामुळे राज्यभरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पडळकरांच्या वक्तव्याच्या विरोधात आंदोलने झाली,हिंसक इशारे देण्यात आले.भावना दुखावतील,कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी भाषा समाज माध्यमातून वापरण्यात आली. विशेषत: धनगर समाजाला उद्देशून चुकीच्या प्रतिक्रिया नोंदवण्यात आल्या.त्यामुळे सामाजिक अस्वस्थता वाढली.जुनोनी (ता. सांगोला, जि. सोलापूर) व वाळेखिंडी (ता. जत, जि. सांगली) येथील तरूणांमध्ये शिवीगाळ झाली.राज्यभरात धनगर व मराठा समाजामध्ये तेढ निर्माण झाली.दुसरीकडे पडळकर यांच्या वक्तव्याचे समर्थन करण्यासाठी अनेक ठिकाणी आंदोलने झाली.
संपुर्ण जग,देश आणि राज्य कोरोनाच्या महाभयानक संकटाशी झुंजत असताना या वक्तव्यामुळे झालेला तणाव निश्चितच महाराष्ट्राला भुषणावह नाही सर्व शासकीय यंत्रणा फिजीकल डिस्टन्सिंग राहावे म्हणून सर्वशक्ती पणाला लावत असताना दोन्ही बाजूच्या लोकांनी फिजीकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला.लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी रात्रंदिवस राबणाऱ्या पोलिस यंत्रणेवरही तणाव आला. राज्यात लागू असलेल्या एपिडेमिक एक्टचेही ठिकठिकाणी उल्लंघन झाले आहे. या सर्व प्रकरणाला पडळकर यांचे वक्तव्य कारणीभूत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी होणे अपेक्षित आहे.ज्या दिवशी पडळकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले,त्यादिवशी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी या वक्तव्याच्या चौकशीची घोषणा केलेली आहे. त्याला अनुसरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांची चौकशी करावी, अशी आमची प्रमुख मागणी असल्याचे ढोणे यांनी सांगितले.
पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर फडणवीस- चंद्रकांत पाटील या प्रमुख नेत्यांनी त्यांचे समर्थन करणारी वक्तव्ये केली आहेत. २४ जून रोजी देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर येथे पत्रकारांशी बोलताना पडळकरांच्या भावना तीव्र आहेत,मात्र शब्द जपून वापरायला पाहिजेत,अशा आशयाचे वक्तव्य केले आहे. त्यात पडळकरांच्या तीव्र भावनेला फडणवीसांनी आपली संमती दर्शवली आहे. चंद्रकांत पाटील यांनी २५ जून आणि २७ जून असे दोनवेळा कोल्हापूर येथे पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मते मांडली आहेत. पडळकर समजूतदार आहेत, ते भावनेच्या भरात बोलले आहेत, असे म्हणून त्यांना पाठिंबा दिला आहे. तसेच मला व देवेंद्र फडणवीसांना टोपण नावं (चंपा, टरबुज्या) कां ठेवतात,असे म्हणत पडळकरांचे वक्तव्य बरोबर ठरवण्याचा प्रयत्न केला आहे असेही ढोणे यांनी म्हटले आहे.पडळकरांनी फडणवीसांकडे भावनेच्या भरात बोलल्याचे स्पष्टीकरण दिले आहे, त्यामुळे हा विषय संपला आहे, असे चंद्रकांत पाटलांनी जाहीर केले आहे. वस्तुत: पडळकरांनी कोणतीही दिलगिरी व्यक्त केलेली नसताना पाटील हा विषय संपला, असे एकतर्फी जाहीर करतात. याचा अर्थ या संपुर्ण प्रकरणात त्यांचा सहभाग आहे. भाजप नेत्यांवर टीका केली जाते म्हणून शरद पवारांवरील टीका बरोबर आहे, असे चंद्रकात पाटलांचे स्पष्ट मत दिसते आहे. २९ जून रोजी देवेंद्र फडणवीस यांनी अकोला येथे बोलताना चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका झाली तर त्यावेळी कां बोलले जात नाही, असा सवाल करून पडळकरांचे वक्तव्य बरोबर ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. चंद्रकांत पाटील हे फडणवीसांचे नाव घेवून तर फडणवीस हे चंद्रकांत पाटलांचे नाव घेवून पडळकरांच्या वादग्रस्त टिकेचे समर्थन करत आहेत. अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या समर्थनार्थ आंदोलने केली आहेत. त्यावरून पडळकरांचे वक्तव्य हे भाजपचीच भुमिका असल्याचे स्पष्ट दिसत आहे असेही ढोणे यांनी तक्रारीत नमुद केले आहे.
ज्यादिवशी फडणवीस सोलापूर जिल्ह्यात होते, त्याचदिवशी पडळकरांनी सोलापूर जिल्हयात जावून वादग्रस्त वक्तव्या केले, त्यासंबंधाने फडणवीस व पडळकरांमध्ये झालेल्या संपर्काची चौकशी करण्यात यावी. पडळकर हे आमदार झाल्यापासून वाद होईल असेच वर्तन करत आहेत. त्यासंबंधीच्या बातम्या सांगली जिल्ह्यातील वर्तमान पत्रात,डिजीटल मिडीयात प्रसिद्ध झाल्या आहेत. लॉकडाऊन असताना ते सांगली जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात फिरत आहेत. ते कर्नाटकातही जावून आले. ठिकठिकाणी त्यांनी बैठका घेतल्या आहेत. यानिमित्ताने पडळकरांनी नक्की काय काय केले, याची चौकशी होणे आवश्यक आहे. पडळकरांच्या तोंडून वक्तव्य करून घेवून देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी धनगर- मराठा भांडण लावल्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी म्हटले आहे. तसेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी पडळकरांचे बोलावते धनी हे देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भातील बातम्या प्रिंट, डिजीटल मिडीयात प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यामुळे पडळकरांनी केलेले वक्तव्य आणि त्यानंतर झालेली आंदोलने यात देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांचा सहभाग स्पष्ट दिसतो आहे. महाराष्ट्रात जातीय तेढ वाढवण्याचे षढयंत्र या पाठीमागे दिसत आहे. कोरोनाचे महायभंकर संकट असताना हा महाराष्ट्र द्रोही प्रकार करणाऱ्या प्रवृत्तींना कायद्याने वेसन घालणे आवश्यक आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांची चौकशी व्हावी, अशी मागणी ढोणे यांनी केली आहे.