रामदेव बाबा विरोधात ४२० चा गुन्हा दाखल करा !

मुंबई नगरी टीम

मुंबई :  कोरोनील औषधाने कोरोना बरा होतो असा दावा करुन पतंजलीने मोठी प्रसिद्धीही केली. परंतु राजस्थान सरकार व उत्तराखंड सरकारने कारवाईचा बडगा उगारताच असे औषध निर्माण केलेच नाही असा पवित्रा पतंजलीने घेतला आहे. कारवाईच्या भीतीने त्यांनी भूमिका बदलली असली तरी कोरोना बरा करणारे औषध निर्माण केल्याचा खोटा दावा करुन जनतेची दिशाभूल, फसवणूक व बनवाबनवी केल्याबद्दल रामदेवबाबा, आचार्य बालकृष्ण, डॉ. तोमर यांच्यासह  त्यांच्या ६ सहकाऱ्यांवर ४२० चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस रामकिशन ओझा यांनी केली आहे.

ओझा यांनी यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात असे म्हटले आहे की, कोरोनाच्या गंभीर संकटाचा सामना आपण सर्वजण करत असताना काही लोक या संकटातही गैरफायदा घेत असल्याचे दिसत आहे. पतंजली या आयुर्वैदिक औषध कंपनीने या संधीचा गैरफायदा घेण्यासाठी कोरोनील नावाचे औषध आणल्याचा दावा केला होता. परंतु या औषधाची कोठेही चाचणी केलेली नव्हती.हा सर्व प्रकार जनतेची दिशाभूल, फसवणूक करणारा असल्याने नागपूरच्या कोराडी पोलीस स्टेशनमध्ये २४ जून रोजी रामदेवबाबा व त्यांच्या साथीदारांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा यासाठी अर्ज दाखल केलेला आहे. परंतु आजपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.पतंजलीने भूमिका बदलली असली तरी अशापद्धतीने जनतेची फसवणूक करणे हा एक गुन्हाच आहे. त्यामुळे या तक्रारीची तातडीने दखल घेऊन रामदेवबाबावर गून्हा दाखल करण्याचे आदेश संबंधित पोलीस स्टेशनला द्यावेत, असे ओझा म्हणाले.

Previous articleपडळकर प्रकरणी देवेंद्र फडणवीस-चंद्रकात पाटलांची चौकशी करा
Next articleभाजप आमदाराचा महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप