…मग विरोधी पक्षनेत्याचा बंगला का बरं काढून घेतला ?

मुंबई नगरी टीम

मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या मुलाखतीत केंद्र सरकारने प्रियांका गांधी यांचा बंगला काढून घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.या टीकेवर भाजपचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रश्न उपस्थित करून ६-७ महिने उलटूनही सरकार जाणीवपूर्वक शासकीय निवासस्थान देत नाही.महाविकास आघाडी सरकारची ही सूडभावना की प्रेमभावना असा टोला लगावला आहे.

सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घेतलेल्या मुलाखतीत पवार यांना प्रियंका गांधी यांना राहत्या घरातून मोदी सरकारने बाहेर काढल्याबाबतचा प्रश्न विचारला होता.सत्तेचा दर्प जर का एकदा तुमच्या डोक्यात गेला की, मग अशा प्रकारच्या गोष्टी होतात. जवाहरलाल नेहरू यांचे योगदान स्वातंत्र्य चळवळीत मोठेच होते. त्यांच्या कन्या इंदिरा गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले.अशा कुटुंबातील मुलगी म्हणजे प्रियंका.राजीव गांधींची हत्या झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या पक्षाचे किंवा सार्वजनिक क्षेत्रात काम करण्यासाठी सोनियाजी किंवा ती प्रयत्न करतेय ठीक आहे, राजकीय वादविवाद असतील, पण याचा अर्थ माझ्या हातात सत्ता आहे,त्या सत्तेचा गैरवापर करून तुम्हाला आम्ही त्रास देवू शकतो.यात काही शहाणपणा नाही असे उत्तर देवून पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

पवारांच्या या उत्तराचा आधार घेत भाजपचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून पवार यांना सवाल केला आहे.सामनाच्या मुलाखतीत पवार साहेब म्हणतात प्रियांका गांधींचे घर काढून घेतले सुडाने! मग विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांना दिलेला बंगला का बरं काढून घेतला?  ६-७ महिने उलटूनही सरकार जाणीवपूर्वक शासकीय निवासस्थान देत नाही…महाविकास आघाडी सरकारची ही सूडभावना की प्रेमभावना ? असा प्रश्न दरेकर यांनी उपस्थित करून पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

Previous articleराज्यातील सध्याची परिस्थिती पाहता अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे अशक्य
Next articleराज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३८ टक्के कायम