दरेकरांचा पवारांना सवाल : मग मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाच्या चरणी साकडे का घातले !

मुंबई नगरी टीम

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप यांना पूर्ण भान आहे की, कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचे व नाही. देशातील कोरोनोचा प्राद्रूर्भाव संपविण्यासाठी सर्वाधिक उपाययोजना पंतप्रधान नरेंद्र मोदी करित आहेत. हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची आवश्यकता नाही. मंदिर बांधून कोरोना जाणार नाही याचे निश्चित भान त्यांना आहे, परंतु आपल्या देव दैवतांचा आशिर्वाद आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. जर मंदिर बांधून व देवाची उपासना करुन कोरोना जाणार नसेल तर राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंढरपूर येथे जाऊन विठ्ठलाच्या चरणी जाऊन महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील कोरोना जाऊ दे असे साकडे घातले त्याचे उत्तर आपल्याकडे आहे असा सवाल विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर राष्ट्रवादी कॉंग्रसेचे अध्यक्ष शरद पवार यांना केला आहे.

आम्हाला वाटते की कोरोना थांबवला पाहिजे आणि काहींना वाटते की मंदिर बांधून कोरोना जाईल, असा टोला अप्रत्यक्षपणे शरद पवार यांनी मोदी सरकारला सोलापूर येथील दौ-या दरम्यान लगावला आहे. त्यावर भाष्य करताना विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी सांगितले की, लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान होत असल्याची जाणीव पंतप्रधान मोदी यांना आहे, म्हणूनच या संकटमय परिस्थितीत मोदी यांनी देशासाठी गरिब कल्याण योजनेच्या माध्यमातून १ लाख ७० हजार कोटीचे पॅकेजचा तात्पुरता दिलासा जनतेला दिल्यानंतर २० लाख कोटीचे आत्मनिर्भर पॅकेज मधून देशाच्या आर्थिक व्यवस्थेला चालना दिली व देशाला आत्मनिर्भर  करण्यासाठी त्यांनी भर दिला, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदी कोरोनाच्या परिस्थितीत पूर्ण संवेदनशील आहेत. पण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असून येथे कोरोना रोखण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याच्या आवश्यकता आहेत, पण दुदैर्वाने त्या होत नाही, म्हणून रोज कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जात आहे, याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. उलटपक्षी विरोधी पक्ष नेते व भाजप जनतेमध्ये जाऊन व सेवाकार्य करुन कोरोनाच्या बाबतीत आपली बांधिलकी सांभाळत आहे, याचेपण भान सर्वांना असले पाहिजे असेही दरेकर यांनी नमुद केले.

Previous articleमोठा दिलासा : अंगणवाडी सेविकांना कोरोना सर्वेक्षणाच्या कामातून वगळले
Next articleठाकरे सरकार मधील “या” कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाची लागण