सिध्दार्थ महाविद्यालयाला निधी द्या… अन्यथा आंदोलन करणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : फोर्ट येथील सिध्दार्थ महाविद्यालयाच्या इमारतीची दुरावस्था झाली आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे या इमारतीला गळती लागली आहे. या इमारतीच्या विकासकामाचा सुमारे ९ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासन दरबारी रखडला आहे. पण राज्य शासनाला याचे सोयरसुतक नाही, त्यामुळे राज्य सरकारने हा ९ कोटीचा निधी तात्काळ उपलब्ध करुन दिला नाही तर या महाविद्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज दिला.

विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी आज फोर्ट येथील सिध्दार्थ महाविद्यलयाला भेट दिली. सिध्दार्थ महाविद्यालयाची वास्तूची काही प्रमाणात दुरावस्था झाली असून पावसामुळे या वास्तूला गळती लागली आहे. महाविद्यालयाच्या इमारतीमधील अनेक वर्गात पावसाचे पाणी पडत आहे. यासंदर्भात दरेकर यांनी महाविद्यालयाची पाहणी केल्यानंतर सिध्दार्थ महाविद्यालयाचे प्राचार्य यु.एम.म्हस्के यांची भेट घेतली व त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे, मुंबई आरपीआय युवाचे अध्यक्ष रमेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी  बोलताना दरेकर म्हणाले की, या महाविद्यालयाच्या इमारतीला सुमारे १०० वर्षे उलटून गेली आहेत. आम्ही सर्वजण भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमोर नतमस्तक होतो. राज्य सरकार मेट्रोसाठी करोडो रुपये खर्च करते, इंदुमिल स्मारकासाठीसुध्दा करोडो रुपये खर्च करीत आहोत. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या तितक्याच महत्त्वाच्या संस्थेच्या माध्यमातून  खऱ्या अर्थाने उपेक्षित, गरीब, गरजू आणि समाज बांधवांना शिक्षणाची दारे खुली करुन दिली. शिक्षण हे काही लोकांची मक्तेदारी असा समज असताना आज सर्वसामान्यांठी हे महाविद्यालय उभे करुन दिले. आपण स्वत: या कॉलेजचा विद्यार्थी आहोत. पण आज या महाविद्यालयाच्या इमारतीची अत्यंत दयनिय अवस्था आहे. सगळी छप्परे लिकेज होत आहेत. त्यामुळे आज आपण तातडीने येथे भेटीसाठी आलो, असेही त्यांनी सांगितले.

सुमारे ९ कोटीचा प्रस्ताव येथील विकासकामासाठी मंजूर झाला आहे. परंतु राज्य सरकारला याचे गांर्भीय नाही, राज्य सरकारला आपल्या आमदारांना २५- १५ च्या प्रस्तावाखाली कोटयवधी रुपये दयायला निधी आहे, परंतु ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाविदयालयाला सुमारे ९ कोटीचा निधी दयायला वेळ नाही. सरकारला संवेदना नसल्याची टिका करतानाच दरेकर म्हणाले की, समाज कल्याण विभागाचे सचिव जैन साहेब यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणली आहे. विरोधी पक्षनेता असलो तरी मी या महाविद्यालयाचा विदृयार्थी आहे. माझ्या संवेदना, बांधिलकी महाविद्यालयाशी व डॉ. बाबासाहेबांच्या विचारांशी आहे. त्याच्यामुळे जर आपल्याला टोकाची भुमिका घ्यावी लागली तर या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, विद्यार्थी आणि समाज बांधवांना एकत्रित करुन आंदोलनाची भुमिका घ्यावी लागेल असा इशाराही दरेकर यांनी दिला.

महाविद्यालयाचे प्राचार्य म्हस्के यांच्याशी आज चर्चा केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, महाविद्यालयाच्या विकासकामाचा प्रस्ताव शासानाकडे सादर केला असून त्यासाठी सातत्याने आम्ही पाठपुरावा करत आहोत, परंतु शासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे या विषयावर आपण येत्या आठवडयाभरात शासनाकडे बैठक आयोजित करुन हा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगतानाच दरेकर म्हणाले की, या परिसरात मेट्रोचे काम जोरात सुरु आहे. महाविद्यालयाच्या इमारतीसमोरुन मेट्रो रेल्वे जाणार आहे, त्यांचे काम सुरु असल्यामुळे महाविदयालाच्या इमारतीचे छप्पर पडत आहे, स्लॅब पडतोय. ज्या ऐतिहासिक वास्‍तु आहेत त्यापैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ही वास्तु आहे,त्यामुळे या वास्तुचे महात्म्य जपणे ही आपली जबाबदारी आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

Previous articleराज्य सरकारने घेतला मच्छिमारांना दिलासा देणारा निर्णय
Next articleपावणे दोन लाख रुग्णांना डिस्चार्ज ; तुमच्या जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या किती ?