मुंबई नगरी टीम
महाड : राज्यातील तमाम शिवभक्तांना लवकरच आनंदाची वार्ता मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जर अभिनेते,पुढारी रायगडावरील महाराजांच्या सिंहासनापर्यंत जावून दर्शन घेवू शकतात,तर मग शिवभक्तांना सुद्धा तिथपर्यंत जावून दर्शन घेता आले पाहिजे,अशी मागणी रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि खासदार छत्रपती संभाजराजे यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनापर्यंत सर्व सामान्य शिवभक्तांना जावून दर्शन घेता आले पाहिजे, अशी मागणी रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि खासदार छत्रपती संभाजराजे यांनी केली आहे.अभिनेते, नेते राजकीय पुढारी आणि प्रशासकीय अधिकारी सहज पणे चौथऱ्यापर्यंत जातात.त्याचवेळी शिवभक्त सुद्धा शेकडो किलोमीटरचा प्रवास करून रायगडावर येतात.अशा शिवभक्तांना सुद्धा राजसदरचे जवळून दर्शन घेता आले पाहिजे अशी मागणी प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती छत्रपती संभाजराजे यांनी फेसबुकच्या माध्यमातून दिली आहे.
दुर्गराज रायगडावरील महत्वाचे व पवित्र ठिकाण म्हणजे राजसदर.समतेचं,ममतेचं आणि अन्यायाविरुद्ध न्याय मागण्याचं हे ठिकाण म्हणजे भारतवर्षाचे अक्षय उर्जास्थान.याच सिंहसनावरून महाराजांनी देशाला दिशा दिली. अशा पवित्र ठिकाणाचे धुलीकण आपल्या मस्तकी लावण्यासाठी शेकडो किलोमीटर दुरवरुन शिवभक्त गडावर दररोज येत असतात. महाराजांच्या चरणकमलावर माथा टेकून युगपुरूषास अभिवादन करावे,जवळून दर्शन घ्यावे.अशी या शिवभक्तांची माफक अपेक्षा असते.परंतु मागच्या काही वर्षांपासून राजसदरेवर शिवभक्तांना जाण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे अनेक शिवभक्त नाराज होताना दिसतात.राजसदरेवरील कोणत्याही भागाला शिवभक्त नुकसान पोचवणार नाहीत.त्यांच्यासाठी महाराज हे सर्वस्व आहेत.त्यामुळे महाराजांच्या मुर्तीला तसेच,सिंहासन चौथऱ्याला प्राणपणाने जपतील हा विश्वास मला आहे. तरीही जी काही सुरक्षा व्यवस्था करायची असेल ती पुतळ्या शेजारी असेल. शिवभक्तांना लांबून पाठवणे योग्य नाही.लवकरच सर्व शिवभक्तांना राजसदरेवर जाऊन महाराजांचे दर्शन घेता येईल, असा विश्वास छत्रपती संभाजराजे यांनी व्यक्त केला आहे.