मुंबई नगरी टीम
मुंबई : पावसामुळे सिद्धार्थ महाविद्यालयाच्या इमारतीची दुरावस्था झाली असून,या इमारतीच्या विकासकामाचा सुमारे ९ कोटी रुपयांचा प्रस्ताव गेल्या एक वर्षापासून शासन दरबारी रखडला आहे. यासंदर्भांत विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दुरूस्तीसाठी उपलब्ध करुन न दिल्यास महाविद्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर या महाविद्यालयाची डागडुजी आणि महाड येथील सुभेदार संवादकर वसतिगृह बांधकाम यासाठी मिळून १२ कोटी ७९ लाख ७४ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
सिध्दार्थ महाविद्यालयाच्या प्रश्नावर विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने आज सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रालयात भेट घेतली.यावेळी झालेल्या सविस्तर चर्चेतनंतर पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयास ग्रंथालय बांधकाम,ग्रंथालयातील सोयी सुविधा,वाणिज्य व विधी महाविद्यालयाची डागडुजी आणि महाड येथील सुभेदार संवादकर वसतिगृह बांधकाम यासाठी मिळून १२ कोटी ७९ लाख ७४ हजार रुपये निधी मंजूर करण्याचा निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री मुंडे यांनी घेतला आहे.सिद्धार्थ कॉलेजच्या मोडकळीस आलेल्या या वास्तूची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करण्याचेही मुंडे यांनी यावेळी मान्य केले.विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी सिध्दार्थ महाविद्यालयाच्या वास्तूच्या दुरुस्तीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच या वास्तूची काही दिवसांपूर्वी प्रत्यक्ष पाहणी केली होती.विरोधी पक्ष नेते दरेकर यांच्यासोबतच्या शिष्टमंडळामध्ये आमदार भाई गिरकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे, मुंबई आरपीआय युवाचे अध्यक्ष रमेश गायकवाड, सिध्दार्थ महाविद्यालयाचे प्राचार्य यु.एम.म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते.
फोर्ट येथील सिद्धार्थ कॉलेजच्या इमारतीमध्ये पावसामुळे अनेक ठिकाणी गळती लागली आहे. लायब्ररीमध्येही पाणी पडते आहे. गळतीमुळे इमारतीला धोका निर्माण झाला आहे. या इमारतीच्या विकासकामाचा सुमारे ९ कोटी रुपयांचा प्रस्ताव २५ मार्च २०१९ पासून शासन दरबारी रखडला आहे. यासंदर्भांत प्रवीण दरेकर यांनी फोर्ट येथील सिध्दार्थ महाविदयालयाला भेट देऊन, कॉलेजच्या इमारतीला झालेल्या दुरावस्थेची नुकतीच पाहणी केली होती. तसेच या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधले होते. राज्य सरकारने हा ९ कोटीचा निधी तात्काळ उपलब्ध करुन दिला नाही तर या महाविद्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी दिला होता.
दरम्यान, प्रविण दरेकर यांच्या पाठपुराव्यामुळेच आज सिद्धार्थ कॉलेजचा विषय मार्गी लागला आहे. दरेकर स्वत सिद्धार्थ कॉलेजचे विद्यार्थी आहेत. बाबासाहेबांच्या या कॉलेजमधून लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडले आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या या वास्तूविषयी आपणासही आस्था असल्याचे सांगत मुंडे यांनी विकासकामांचा प्रलंबित प्रस्ताव तातडीने मार्गी लावला आहे.