हे तर गलिच्छ राजकारण ; पण मी संयम बाळगलाय!

मुंबई नगरी टीम

मुंबई : अभिनेता  सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून लक्ष्य केलेले राज्याचे पर्यावरणमंत्री अदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर हल्लाबोल करीत प्रत्युत्तर दिले आहे. सरकारचे यश,लोकप्रियता ज्यांना खुपते त्यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण सुरू केले आहे.सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तिशः माझ्यावर तसेच ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखी असून, मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे, अशा शब्दात त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे.

‘कोरोना’ संकटाने देशभर हाहाकार माजवला आहे.महाराष्ट्राचे सरकारही ‘कोरोना’चा पराभव करण्यासाठी शर्थ करीत आहे.बहुधा,महाराष्ट्र सरकारचे यश,लोकप्रियता ज्यांना खुपते त्यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण सुरू केले आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तिशः माझ्यावर तसेच ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे.मुळात या सर्व प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. सिनेसृष्टी म्हणजे’ बॉलीवूड ‘ हे मुंबई शहराचे एक महत्त्वाचे अंग आहे. या उद्योगावर हजारोंचा रोजगार अवलंबून आहे. त्यापैकी अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध नक्कीच आहेत.हा काही गुन्हा नाही असेही आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले आहे.

सुशांतसिंग राजपूतचा मृत्यू दुर्दैवी तितकाच धक्कादायक आहे.मुंबईचे पोलीस या प्रकरणाचा खोलवर तपास करीत आहेत व महाराष्ट्राच्या पोलिसांना जागतिक प्रतिष्ठा आहे,पण ज्यांचा कायद्यावर विश्वास नाही तेच लोक याप्रकरणी फालतू आरोपांचा धुरळा उडवीत तपास भरकटवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू म्हणून सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या व ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल असे कृत्य माझ्या हातून कदापि होणार नाही. फालतू आरोप करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे. या प्रकरणाची कुणाकडे काही विशेष माहिती असेल तर ती पोलिसांनाच द्यायला हवी. पोलीस नक्कीच त्या दिशेने तपास करतील. याप्रश्नी मी आजही संयमानेच वागत आहे. अशाप्रकारे चिखलफेकी करून सरकार व ठाकरे परिवारास बदनाम करता येईल या भ्रमात कोणी राहू नये. तूर्त इतकेच ! अशा शब्दात त्यांनी आरोप करणा-यांना सुनावले आहे.

Previous articleअभिनेता सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या नसून हत्या !
Next articleबाप्पा पावले : गणेशभक्तांना  प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही