‘सुसाईड नोट’ मध्ये नाव असणा-या अर्णब गोस्वामीवर कारवाई करा

मुंबई नगरी टीम

मुंबई : आर्किटेक्ट अन्वय नाईक यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या ‘सुसाईड नोट’ मध्ये कोणत्या कारणाने व कोणामुळे आत्महत्या करीत आहे अशा व्यक्तींची नावे लिहून ठेवली आहेत. त्या नोटमध्ये  अर्णब गोस्वामी आणि इतर दोन व्यक्तींची नावे असतानाही कोणताही तपास न करता त्यांच्यावर कारवाई झालेली नसल्याने या प्रकरणी दोषींवर कायद्याप्रमाणे कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी या प्रकरणी खालच्या दर्जाचे राजकारण करून अनेक लोकांना विनाकारण बदनाम केले आहे. मुंबई पोलीस योग्य तपास करीत असताना केवळ राजकीय हेतूने आरोप करुन,महाराष्ट्र सरकारची विनाकारण बदनामी अर्णब गोस्वामी हे आपल्या शो मधून करत असल्याची जनतेची भावना झाली आहे. आर्किटेक्ट अन्वय नाईक यांच्या पत्नीने न्याय मिळण्याची मागणी केली असून,अक्षता नाईक यांचा विनंती करणारा एक व्हिडिओ मला मिळाला आहे,त्यात ‘अर्णब गोस्वामी माझ्या सासू आणि नवऱ्याच्या आत्महत्येला, मृत्यूला जबाबदार आहेत.गेल्या सरकारने आमची केस दाबून टाकली मला न्याय मिळाला नाही. अर्णब गोस्वामी माझ्या कुटुंबाचा गुन्हेगार आहे. त्याला अटक झाली पाहिजे.’ असे  नाईक यांचे म्हणणे आहे असे आ.सरनाईक यांनी गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

आर्किटेक्ट अन्वय नाईक व त्यांच्या आई कुमुद नाईक यांचा ५ मे रोजी मौजे कावीर, ता. अलिबाग येथे त्यांच्या घरी मृत्यू झाला होता.त्याच दिवशी त्यांच्या कुटुंबियांने प्रथम खबर अहवाल (FIR) पोलिसात देण्यात आला होता. त्या गुन्ह्याची पोलिसांनी नोंदही करून घेतली. आत्महत्या करण्यापूर्वी आर्किटेक्ट अन्वय नाईक यांनी ‘सुसाईड नोट’ लिहून ठेवली होती.त्यात कोणत्या कारणाने व कोणामुळे आत्महत्या केली त्यांची नावे आहेत त्या नोटमध्ये पहिले नाव अर्णब गोस्वामी यांचे व इतर २ नावे आहेत. पण त्या गुन्ह्याचा कोणताही तपास न करता आरोपीवर कारवाई झालेली नाही. नाईक कुटुंबीयांनी अनेक ठिकाणी दाद मागूनही त्या प्रकरणात कोणाला अटक झाली नाही, असे या कुटुंबाचे म्हणणे आहे.अलिबाग पोलिसात दाखल असलेल्या एफ.आय.आरनुसार, अर्णब गोस्वामी यांच्या मुंबईतील स्टुडिओचे काम आर्किटेक्ट अन्वय नाईक यांच्या कंपनीने घेतले होते. त्या कामापोटी उर्वरित रक्कम ८३ लाख रुपये गोस्वामी यांनी नाईक यांना काम पूर्ण झाल्यानंतरही दिली नाही. वारंवार मागणी करूनही कामाचे हे पैसे परत न मिळाल्याने आर्थिक व मानसिक दडपण आल्याने अखेर नाईक यांनी आत्महत्या करून स्वतःचे जीवन संपवले असेही नाईक कुटुंबियांने दिलेल्या माहितीच्या आधारे आ.सरनाईक यांनी पत्रात म्हटले आहे.

इतकी गंभीर घटना असूनही तेव्हा पोलिसांनी यात तपास केला नाही व गुन्हेगारांवर कोणतीही कारवाई केली नाही, असा नाईक कुटुंबीयांचा आरोप आहे.अन्वय यांच्या पत्नी न्याय मिळविण्यासाठी दारोदार जात आहेत.काही वर्षापूर्वी ठाण्यात बिल्डर सुरज परमार आत्महत्या प्रकरणात ‘सुसाईड नोट’ ग्राह्य धरून आरोपीना अटक करण्यात आली होती. तीच तत्परता आर्किटेक्ट अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात का दाखवली गेली नाही ? त्यामुळे आता नाईक यांच्या आत्महत्याप्रकरणी सुसाईड नोट व पत्नीने नोंदवलेला एफ.आय.आर ग्राह्य धरून आरोपीवर अटकेची पुढील कारवाई करायला हवी अशीही मागणी आ.सरनाईक यांनी केली आहे.अर्णब गोस्वामी व अन्य दोघे हे माझे पतीच्या मृत्यूस कारणीभूत असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी’ अशी एफ.आय.आर त्याचवेळी नाईक कुटुंबाकडून नोंदवली गेली होती.अर्णब गोस्वामी यांचे सुसाईड नोटमध्ये पहिले नाव असतानाही अर्णब गोस्वामी यांना केंद्र व राज्य सरकारमधील कोणत्या नेत्याने त्यावेळी वाचविण्याचा प्रयत्न केला ? याचीही चौकशी झाली पाहिजे अशीही मागणी सरनाईक यांनी केली आहे.

अर्णब गोस्वामी  आणि इतर जणांना वाचविण्यात आले, पण नाईक कुटुंबियांना न्याय मिळाला नाही. नाईक कुटुंबीय आजही न्यायासाठी झगडत असून त्यांनी सरकारकडे पुन्हा चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे मराठी आर्किटेक्ट अन्वय नाईक व त्यांच्या आईच्या मृत्यूप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याचा तेव्हा तपास का झाला नाही ? तेव्हा पोलिसांनी नक्की काय तपास केला ? पुढे त्याचे काय झाले? तो तपास खरंच नीट झाला होता का ? की कोणाचा पोलिसांवर दबाव होता ? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. नाईक कुटुंबीय न्याय मिळाला पाहिजे म्हणून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करून जे जे दोषी असतील अशा आरोपीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सरनाईक यांनी करून, ज्या स्टुडिओत बसून अर्णब गोस्वामी सध्या सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाबद्दल बोलत आहेत, त्याच स्टुडिओमध्ये अन्वय नाईक यांचा आत्मा तडफडत आहे, असे त्यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी सत्य बाहेर येऊन त्याला न्याय मिळालाच पाहिजे. पण त्याला राजकीय वळण देऊन निव्वळ राजकीय फायदा व कोणाची तरी खोटी बदनामी करणे हे कदापि योग्य नाही.नियम आणि कायदा सगळ्यांना सारखा आहे. सुशांतला न्याय मिळालाच पाहिजे यावर कोणाचेही दुमत नाही. पण त्याच पद्धतीने तत्परता दाखवून आर्किटेक्ट अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी योग्य तो तपास करून सत्य बाहेर यावे, जे दोषी असतील त्यांच्यावर कायद्याप्रमाणे कारवाई करावी, अशी विनंती मी नाईक कुटुंबियांच्या वतीने करीत आहे असे आ. सरनाईक यांनी गृहमंत्री देशमुख यांना लिहिलेल्या म्हटले आहे.

Previous articleराज्य सरकारने फडणवीस यांच्या काळातील अजून एक योजना केली बंद
Next articleगुगल क्लासरुमच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्राची भरारी