मुंबई नगरी टीम
मालवण : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक गुलाबराव चव्हाण यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड आदींच्या उपस्थित होते. मालवणमधील नारायण राणेंच्या निवासस्थानी चव्हाण यांचा पक्ष प्रवेश पार पडला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून चव्हाण ओळखले जात होते.
गुलाबराव चव्हाण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक नेते असले तरी, सहकार क्षेत्रात त्याचं नाव मोठं आहे. गेल्या ३० वर्षाहून अधिक काळ ते सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या संचालकपदी विराजमान आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये जाणार अशी चर्चा रंगलेली होती. मात्र ही खोटी अफवा असल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिलं. उलट निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले राष्ट्रवादीचे आमदार पुन्हा पक्षात परतणार असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. परंतु यावर कोणताही निर्णय झाला नसून लवकरच याविषयी घोषणा होईल, असं त्यांनी म्हटलं. मात्र असं असतानाच गुलाबराव चव्हाण यांचा भाजप मध्ये जाण्याचा निर्णय हा राष्ट्रवादीसाठी एक संकेत असल्याचं बोललं जात आहे.