मुंबई नगरी टीम
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार हे गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. यावेळी देखील पार्थ पवार यांच्या एका कामगिरीमुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. या चर्चेला कारण पुण्यातील एक गुणवंत विद्यार्थी ठरला आहे. या विद्यार्थ्याने दहावीच्या परिक्षेत ८२.८० टक्के गुण मिळवून घवघवीत यश मिळवलं आहे. परंतु घरची परिस्थिती हालाकीची असल्याने पुढच्या शिक्षणाचं काय? हा प्रश्न या विद्यार्थी आणि त्याच्या पालकांना होताचं. मात्र यावेळी पार्थ पवार यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
पार्थ पवार यांनी आपल्या फेसबूकवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. या गुणवंत विद्यार्थ्याचं नाव अनंत डोईफोडे असं आहे. अनंत हा पुण्याजवळच्या वेल्हा तालुक्यातील वडगार येथील रहिवासी आहे. त्याने दहावीत यश संपादन केल्याची काैतुकास्पद बाब एका वृत्तपत्रात छापून आली होती. या माध्यमातून अनंतच्या घरची हालाकीची परिस्थिती समजताच पार्थ पवार यांनी अनंतला मदत करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी पार्थ पवार यांनी अनंतच्या पुढील शिक्षणाचा सर्व खर्च उचलणार असल्याचा शब्द दिला आहे. तसंच त्यांनी अकरावीची पुस्तकं आणि एक सायकल अनंतला भेट दिली आहे. पार्थ पावर यांनी याबाबात अधिक माहिती देताना म्हटलं की, “शिक्षणाप्रती असलेली अनंत डोईफोडेची ओढ व जिद्द पाहून त्याला पुस्तके आणि सायकल भेट दिली. महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक उपाध्याक्ष अभिषेक बोकेच्या सोबतीनं त्याच्या पुढील शिक्षणाची आणि शिकवणी शुल्काची देखील सोय करण्यात आली आहे. अनंता, अशीच प्रगती करत रहा. तुझा दृढनिश्चय आणि चिकाटी पाहता तू तूझी स्वप्न नक्कीच पूर्ण करशील”!