मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यात जिम पुन्हा सुरू करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात जोर धरत असताना सरकारकडून आता यासाठी सकारात्मता दाखवली जात आहे. त्यानुसार येत्या दोन दिवसांत राज्यात जिम सुरू करण्याच्या विचार सरकारचा असल्याची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. एका वाहिनीला प्रतिक्रिया देताना त्यांनी याबाबत सांगितले. त्यामुळे राज्यातील जिम चालकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही मागणी लावून धरली होती.
यावर अधिक माहिती देत विजय वडेट्टीवार म्हणाले, “राज्यातील जिम सुरू करावेत, अशी अनेक दिवसांची मागणी होती. विशेष करून गेल्या चार महिन्यामध्ये जिम व्यावसायिक अडचणीत होता आणि आरोग्याच्या दृष्टीनेही अनेकांच्या समस्या सुरू होत्या. शेवटी जिम म्हणजे काय, फिजीयोथेरपी त्यात आहे. म्हणुन आम्ही आमच्या सरकारने जिम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या एक दोन दिवसांमध्ये राज्यातील सर्व जिमला नियमांचे पालन करून त्यांना जिम सुरू करण्याची परवानगी देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या संदर्भातील आदेशावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी झाल्यानंतर राज्यात जिम सुरू करण्याची परवानगी दिली जाईल”, असे वडेट्टीवार म्हणाले. तसंच राज ठाकरेंची मागणी सुद्धा रास्त होती. मात्र सरकारने सर्वतोपरी विचार करूनच हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी म्हटले.
राज्यात टाळेबंदीमुळे गेले चार महिने जिम बंद आहे. मात्र मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक उद्योगधंदे पुर्वपदावर येत असताना जिम सुरू करण्याचा प्रश्न मात्र जैसे थे होता. टाळेबंदीमुळे व्यवसायावर कु-हाड आलेल्या जिम चालक-मालकांनी आंदोलन करत सरकारकडे साकडे घातले होते. मात्र सरकार कोणताच निर्णय घेत नसल्याने जिम चालकांनी थेट राज ठाकरेंची भेट घेतली होती. यावर राज ठाकरेंनी जिम सुरू करा, पुढे काय होईल ते बघू, असे म्हटले होते. यासह देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यातील जिम तत्काळ सुरू करण्याच्या मागणीचे पत्र मुख्यमंत्र्यांना धाडले होते.