नेत्याने आदित्य ठाकरेंची पाठराखण करताच मनसेमधून नाराजीचा सुर !

मुंबई नगरी टीम

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणातील वाद रंगत असतानाच यामध्ये राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आदित्य ठाकरेंची पाठराखण केली. मात्र नांदगावकरांच्या या भूमिकेवरून मनसेमधून असहमती दर्शवली जात असल्याचे समोर आले आहे.त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांकडून सोशल मिडियावर हा असहमतीचा सुर उमटताना दिसला.

सुशांतसिंह प्रकरणावरून आदित्य ठाकरेंवर टीका केली जात आहे. यासंदर्भात आपली प्रतिक्रिया देताना बाळा नांदगावकार म्हणाले, “ठाकरे कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून अशा प्रकारच्या घटनेमध्ये सहभाग असेल, असे मला वाटत नाही. भाजपच्या आरोपांमुळेच हा वाद सुरू झाला. परंतु एकंदरीत आता सर्वांनी सीबाआयची मागणी केली आहे. त्यामुळे जे काही असेल ते समोर येईल”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. मात्र नांदगाकर यांच्या भूमिकेवर मनसे नेते संतोष धुरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.”बाळा नांदगावकर यांनी जी प्रतिक्रिया दिली ते त्यांचे वैयक्तिक मत असेल. परंतु एक सामान्य महाराष्ट्र सैनिक म्हणून मी सुद्धा याबाबत सहमत नाही आहे. कारण शिवसेनेने दिलेला त्रास आणि दररोज आमचा त्यांच्याशी होणारा संघर्ष विसरणार नाही”, असे संतोष धूरी यांनी म्हटले आहे. दरम्यान या सर्व प्रकरणावर राज ठाकरे नेमकी कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Previous articleखूशखबर : येत्या दोन दिवसांत जिम सुरू होणार 
Next articleमहाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे: मुख्यमंत्री ठाकरे