मंत्री आदित्य ठाकरेंना ठार मारण्याची धमकी ; एसआयटी मार्फत चौकशी

मुंबई नगरी टीम

मुंबई । पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना कर्नाटकमधील व्यक्तीकडून देण्यात आलेल्या व्हॉटस्अ‍ॅप धमकीचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले.दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी हत्याकांडाचे कनेक्शन कर्नाटक होते. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना आलेली धमकी हे षड्यंत्र असू शकते असा संशय शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी व्यक्त केली. ठाकरे यांना आलेली धमकी गंभीर असून याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सर्वपक्षीय सदस्यांकडून करण्यात आली. यावर उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संबंधित आरोपी जयसिंग रजपूत याला कर्नाटकातून अटक करण्यात आली असून अशा प्रकारच्या धमक्यांसंदर्भात सर्वंकष चौकशी व्हावी यासाठी एसआयटी नेमली जाईल अशी घोषणा सभागृहात केली.

शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करीत आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमकीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, धमकी देणारा आरोपी हा कर्नाटकात सापडला असल्याने याबाबत अनेक तर्कवितर्क निर्माण झाले आहेत. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्याकांडाचे कनेक्शन कर्नाटकात होते. तेव्हापासून त्या ठिकाणी भाजपचे सरकार आहे. या धमकी देणार्‍यांच्या पाठीशी नेमके कोण आहे. त्यामुळे हे जाणीवपूर्वक केलेले षड्यंत्र असू शकते असा मुद्दा उपस्थित केला.तर अभिनेता सुशांतसिंह याच्या आत्महत्येचे सोशल मीडिया ट्रेंडिंग करण्यासाठी महिन्याला ३० लाख रुपये देण्यात आले. याचे कनेक्शनही कर्नाटकात सापडल्याचे नवाब मलिक यांनी निदर्शनास आणले. ठाकरे यांना आलेली धमकी गांभीयपूर्वक घ्यावी, अशी सूचना छगन भुजबळ यांनी केली.आदित्य ठाकरे आलेल्या धमकीचा मी निषेध करतो. अशा धमकी देणा-याला ठेचलेच पाहिजे. आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमकीची उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी. त्याचप्रमाणे जर कर्नाटक सरकाचं यामध्ये सहकार्य आवश्यक असेल तर मी स्वत: कर्नाटकात जाऊन त्या मुख्यमंत्र्यांशी बोलेने, असे आश्वासन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.गौरी लंकेश, कलबुर्गी हत्याकांडाचे कनेक्शन हे कर्नाटकात आहेत. सनातन सारख्या संस्थेचे या हत्याकांडांशी सबंध जोडले जात आहेत. तेव्हा या संस्थेवर बंदी आणण्याची मागणी भाजप सरकार असतानाही करण्यात येत होती. अशा संस्थेवर कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणी नवाब मलिक यांच्याकडून करण्यात आली.

आरोपीने ८ डिसेंबरच्या मध्यरात्री १२च्या सुमारास सर्वप्रथम आदित्य ठाकरे यांना व्हॉट्सअ‍ॅपवर संदेश पाठवला होता. त्यानंतर त्याने तीन दूरध्वनी केले. ठाकरे यांनी ते स्वीकारले नाहीत. त्यानंतर संतापलेल्या आरोपीने जीवे ठार मारण्याच्या धमकीचा संदेश पाठवला. याप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावतीने पोलिसांकडे तक्रार केली.त्यानुसार विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंना आलेल्या धमकीच्या संदर्भात पोलीस विभागानं तपास केला आहे. धमकी देणार्‍याचे नाव जयसिंग बजरंगसिंग रजपूत आहे. तो कर्नाटकमधील बेंगलोरचा रहिवासी असल्याचं निष्पन्न झालं. तिथे ताबडतोब पोलीस पथक रवाना करून आरोपीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली.राज्यस्तरावर एसआयटीची स्थापना करून त्या माध्यमातून आलेल्या धमक्या, घडलेली घटना आणि भविष्याकाळात त्यासाठी करायची उपाययोजना यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून करण्यात आली.

Previous articleमोठी बातमी : राज्यात लवकरच रात्रीचा लॉकडाऊन लावणार ?
Next articleविधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेता मग १२ आमदारांचे निलंबन केव्हा मागे घेणार ?