मुंबई नगरी टीम
मुंबई : देशावरील कोरोनाचे संकट अद्यापही कमी झालेले नाही. दिवसेंदिवस मोठ्या संख्येत कोरोना रुग्णांची वाढ होत आहे.अशा परिस्थिती परिक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने जोखीमेचे असल्याचे मत राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडले आहे. या संदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहले असून अतिंम वर्षाच्या परिक्षेसह विविध शाखांच्या घेतल्या जाणा-या प्रवेश परिक्षांचा मुद्दा पुन्हा अधोरेखित केला आहे.
आदित्य ठाकरे यांनी आपल्या सोशल मिडियावरून याबद्दल माहिती दिली आहे.कोरोनाच्या संकटामुळे परिक्षा घेऊ नये, अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे. “आपल्या नेतृत्वाखाली देश कोरोना विरोधातील लढा देत आहोत. सध्या कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता अनेकजण वर्क फ्राॅम करत आहेत. अशा परिस्थितीत काही शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठे व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परिक्षा घेण्याची तयारी करत आहेत. काही राज्यांना मोठ्या संख्यने कोरोनाच्या रुग्ण वाढीला तोंड द्यावे लागत आहे. तसेच वाहतूकही पूर्ववत झालेली नाही. उलट ज्या देशांत शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यात आली, तिथे अधिक रुग्ण वाढ पाहायला मिळाली. हा विषय केवळ विद्यार्थ्यांशी संबंधित नसून त्यांचे कुटुंब, शिक्षक, शिक्षतेत्तर कर्मचारी यांचाही आहे. माझी नम्र विनंती आहे की, पंतप्रधानांनी यात हस्तक्षेप करावा व सर्व परिक्षा पुढे ढकलण्यात याव्या”, अशी मागणी आदित्य यांनी केली आहे. तसेच जून २०२० ऐवजी जानेवारी २०२१ पासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासंदर्भातील मुद्दा देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
देशातील कोरोनाच्या परिस्थितीमुळे शैक्षणिक वर्ष कोलमडले आहे. अशात अंतिम वर्षाची परिक्षा घ्यावी की नको असा वाद सुरू आहे, महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता अतिंम वर्षाच्या परिक्षा न घेण्याबाबत सकारात्मकता दाखवली आहे. मात्र विद्यापीठ अनुदान आयोगाने परिक्षा घेण्याबद्दलची आपली भूमिका ठाम ठेवली आहे. तर हा मुद्दा आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असून त्यावर सुनावणी सुरू आहे.