काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र; केली महत्वाची मागणी

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यात इतर मागास वर्गाचे (ओबीसी) राजकीय आरक्षण पूर्ववत होण्यासाठी इम्पिरिकल डाटा गोळा करण्याचे काम सुरु आहे परंतु अनेक ठिकाणी केवळ आडनावावरून जात गृहित धरली जात असल्याचे समोर आले असून ही पद्धत चुकीची आहे. ओबीसी समाजाची योग्य आकडेवारी प्राप्त व्हावी यासाठी संबंधितांना सुचना देऊन योग्य ती कार्यवाही व्हावी,अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

यासंदर्भात नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र पाठवले असून ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत झाले पाहिजे ही काँग्रेस पक्षाची भूमिका राहिली आहे. ओबीसी संदर्भातील डाटा गोळा करण्याचे कामही सुरु आहे पण आडनावावरून जात ठरवली जात असल्याचा प्रकार गंभीर आहे.एकाच आडनावाचे लोक विविध जातीत आहेत ही पद्धत शास्त्रोक्त नाही,या पद्धतीने डाटा गोळा केल्यास ओबीसी समाजाची खरी संख्या समोर येणार नाही व समाजावर अन्याय होईल. ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जातीने लक्ष घालावे अशी मागणी केली आहे.ओबीसी समाजाला राजकीय मिळावे म्हणून सर्वांनी लक्ष घातले पाहिजे.ओबीसी संघटना,सर्व राजकीय पक्ष यांनी पुढाकार घेऊन ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी अचूक आकडेवारी जमा होईल यात लक्ष घालावे असे आवाहन पटोले यांनी केले.

Previous articleराष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणार की नाही ? शरद पवार यांनी घेतला मोठा निर्णय
Next articleशरद पवार यांच्या नावाची चर्चा असली तरी…..काय म्हणाले दिलीप वळसे पाटील !