उदय सामंत यांची घोषणा : विद्यापीठांच्या ऑफलाईन परीक्षांसाठी प्रत्येक तासामागे १५ मिनिटे वाढीव वेळ

मुंबई नगरी टीम

मुंबई । कोरोनाच्या संकटामुळे शिक्षण आणि परीक्षा ऑनलाईन पद्धतीने झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाला असल्यामुळे ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेताना वेळ वाढवून देण्याची मागणी युवासेनेकडून करण्यात आली होती.त्या पार्श्वभूमीवर सर्व विद्यापीठांचे कुलगुरू व उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या बैठकीत ऑफलाईन परीक्षांसाठी प्रती तास १५ मिनिटे वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

मागील दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने सुरू होते. त्यामुळे परीक्षासुद्धा या पद्धतीने परीक्षा घेण्यात आल्या. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली. त्यामुळे उच्च व तंत्र शिक्षण विभागाने व विद्यापिठांनी पदवी अभ्यासक्रमाच्या पुढील परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचे घोषित केले.ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे आणि ऑनलाईन परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या लिखाणाच्या सरावावर परिणाम झाला आहे.त्यामुळे वेळेत पेपर लिहिणे कठीण जाईल,असे विद्यार्थ्यांना वाटत होते.त्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी दिलेल्या वेळेत वाढ करावी,अशी मागणी युवासेनेने उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती.या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी तातडीने सर्व विद्यापिठांचे कुलगुरू व उच्च व तंत्र शिक्षण विभागाची ऑनलाईन पद्धतीने बैठक बोलावली होती.त्यानुसार या बैठकीनंतर सर्व अकृषी विद्यापिठांच्या ऑफलाईन परीक्षांसाठी प्रती तास १५ मिनिटांची वाढीव वेळ देण्यात आली असल्याची माहिती सामंत यांनी दिली.

Previous articleनॉट रिचेबल का झालो ? आता पुढचा नंबर अनिल परब,हसन मुश्रीफ आणि यशवंत जाधव यांचा
Next articleहोय..मी मोहम्मद अली रोडवर १३ वा स्फोट झाल्याचे म्हणालो ! शरद पवारांनी सांगितले कारण