मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा : पेट्रोल डिझेलवरचे दर कमी करणार,राज्य शेतकरी आत्महत्यामुक्त करणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दोन मोठ्या घोषणा करीत राज्यातील जनतेला मोठा दिलासा दिला आहे.राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी इंधनावरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल अशीही घोषणा त्यांनी आज विधानसभेत केली.शिवाय शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा शिवसेना-भाजप युती सरकारचा निर्धार असल्याचे सांगत आगामी काळात राज्यातील बळीराजाच्या हिताचे निर्णय घेणार असल्याचे सुचित केले.

गेल्याच आठवड्यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.केवळ घोषणा न करता निर्णयाची अंमबजावणी करून जनतेला दिलासा देणारे नेते अशी त्यांची ओळख आहे.त्याची प्रचिती राज्यातील जनतेला ख-या अर्थाने आज आली.अध्यक्ष निवड आणि बहुमच चाचणीसाठी दोन दिवसाचे विशेष अधिवेशव बोलविण्यात आले होते. आज विश्वासदर्शक ठरावाप्रसंगी भाषणाच्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोल-डिझेलवरील वाढते दर कमी करण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करण्याची घोषणा केली आहे.त्यांच्या या निर्णयामुळे लवकरच राज्यातील पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे.सरकारच्या वतीने पेट्रोल डिझेलवरचा व्हॅट कमी करू आणि बळीराजाच्या मदतीसाठी सर्व प्रयत्न करू.चुकीची कामे करणार नाही.कोणावरही आकस बुद्धी ठेवणार नाही. आम्ही कार्यकर्ते आहोत कार्यकर्तेच राहणार. या राज्यांचे सर्वांगिन काम करणारे सरकार आपण चालवू. केंद्र सरकारचीही मदत घेऊ. आणि राज्याला सुजलाम सुफलाम करू असेही त्यांनी यावेळी राज्यातील जनतेला आश्वस्त केले.

आम्हाला कधीही ग ची बाधा होऊ देणार नाही.राज्यातील शेतकरी आत्महत्या करणार नाहीत यासाठी युती सरकार प्रयत्न करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात या दोन मोठ्या घोषणा करतानाच प्रतोद भरत गोगावले यांनी एक विनंती करताच रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी २१ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा करून आपले सरकार केवळ घोषणा करणारे सरकार नसून प्रत्यक्ष काम करणारे सरकार असल्याचे दाखवून दिले.

Previous articleआता विधानसभेत कडवट शिवसैनिक “भाई” विरूद्ध आक्रमक “दादा” सामना रंगणार
Next articleनकार देवूनही उपमुख्यमंत्रीपद का स्वीकारले ? फडणवीस यांनी सांगितली खरी हकीकत