नकार देवूनही उपमुख्यमंत्रीपद का स्वीकारले ? फडणवीस यांनी सांगितली खरी हकीकत

मुंबई नगरी टीम

नागपूर । शिवसेनेचे बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासमवेत झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करतानाच,शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले होते.त्यांच्या या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला होता. मात्र काही वेळेतच त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.या काळात असे काय घडले की,त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घ्यावी लागली ? याचा उलघडा स्वत : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने बहुमत सिद्ध केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज नागपूरात आगमन झाले.त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ का घेतली याची माहिती दिली.मुंबईतील पत्रकार परिषदेत मी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करतानाच मी या सरकारमध्ये नसेल अशी घोषणाही केली होती.ही घोषणा करून मी घरी गेलो आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी मी सरकारमध्ये सहभागी व्हावं असे जाहीर करून टाकले.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्याशी बोलले.पक्षात आदेश हाच महत्त्वाचा आहे हे लक्षात घेऊन हा निर्णय घेतला असेही त्यांनी स्पष्ट केले.भाजप आणि पंतप्रधान मोदी नसते तर नागपुरातला देवेंद्र फडणवीस कधीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला नसता.त्यामुळे जे नेते आणि पक्ष मला सर्वोच्च पदावर बसवतात,त्यांनी आदेश दिला तर मी घरी बसायलाही तयार आहे. त्यांनी तर माझा सन्मान करून मला सरकारमध्ये जाण्यास सांगितले. म्हणून मी उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली, असे फडणवीस यांनी सांगितले.

राज्यात शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडी तयार झाली,तेव्हाच सांगितले होते की,अशी अनैसर्गिक आघाडी फार काळ चालत नाही.आमचे सरकार गेल्याचे मला दु:ख नव्हते, तर महाराष्ट्र विकासात माघारतोय,याचे दु:ख अधिक होते.शेतक-यांचे,विकासाचे अनेक प्रकल्प थांबले होते.महाविकास आघाडीतील अंतर्विरोध दररोज दिसत होता.शिवसेनेसमोरचे प्रश्न तर मोठे होते.त्यांच्या आमदारांमध्ये मोठी नाराजी होती.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी फारकत घेतल्याने अस्वस्थता अधिक होती.यातून शिवसेनेत एक उठाव झाला आणि त्यांनी निर्णय घेतला असे सांगतानाच हे बंड नाही असे त्यांनी स्पष्ट केले.त्यातून ते आमच्यासोबत आले आणि आम्ही त्यांना मदत केली. आम्ही म्हटले असते,तर मुख्यमंत्रीपद आम्हाला मिळाले असते.पण पदाची लालसा आम्हाला नव्हती.उलट शिवसेनेचाच मुख्यमंत्री करु, हा निर्णय आम्ही आधीच घेतला होता.उलट एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्र्रस्ताव सुद्धा मीच दिला होता.विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या मागास भागावर अन्यायाची मालिका महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू झाली होती.त्यामुळे विकासाला,राज्याला प्रगतीला खीळ लावणारे सरकार जाणे,याला प्राधान्य होते.काँग्रेसने मोदी यांना चायवाला म्हणून हिणवले, त्याच आमच्या पंतप्रधानांनी आज काँग्रेसला पाणी पाजले आहे.त्यामुळे कुणी आम्हाला रिक्षावाले म्हणून हिणवत असेल तर आम्हाला त्याचा आनंदच आहे असेही फडणवीस म्हणाले.

मी,मुख्यमंत्री झालो नाही,याचे सामनाला दु:ख होण्याचे कारण नाही. त्यामुळे त्यांनी उपहासात्मकच लिहिले आहे.उपहासाला उत्तर द्यायचे नसते.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर ठामपणे उभी राहणारी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे.पारिवारिक वारसा हा उद्धव ठाकरे यांच्याकडे असला तरी वैचारिक वारसा सुद्धा महत्त्वाचा असतो.हा वैचारिक वारसा घेऊन एकनाथ शिंदे पुढे जात आहेत असे ते म्हणाले.राज्यातील पूरस्थितीकडे आमचे पूर्ण लक्ष आहे.आपत्ती व्यवस्थापनाची बैठक आम्ही घेतली आहे.मी स्वत: काल रायगड जिल्हाधिका-यांशी सातत्याने संपर्कात होतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा सातत्याने सर्व यंत्रणांशी संपर्कात आहेत.ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात लवकरात लवकर अहवाल प्राप्त करून तो सादर करण्याचा आमचा प्रयत्न आहे.त्यादृष्टीने बैठक सुद्धा झाली.हा अहवाल वेळेत न्यायालयात सादर करण्याला प्राधान्य आहे. ओबीसी समाजाला त्यांचा हक्क लवकरात लवकर प्राप्त व्हावा, हाच उद्देश आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लवकरात लवकर समृद्धी महामार्गाचे उदघाटन आम्ही करू असेही फडणवीस यांनी सांगितले.

Previous articleमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा : पेट्रोल डिझेलवरचे दर कमी करणार,राज्य शेतकरी आत्महत्यामुक्त करणार
Next articleउपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचा माईक खेचला,पुढे काय काय खेचतील ते माहीत नाही