नॉट रिचेबल का झालो ? आता पुढचा नंबर अनिल परब,हसन मुश्रीफ आणि यशवंत जाधव यांचा

मुंबई नगरी टीम

मुंबई । संजय राऊत हे तर फक्त प्रवक्ते आहेत खरे मास्टर माईंड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच आहेत. यापुढे आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संपूर्ण ठाकरे कुटुंबीय यांनी केले मनी लॉंडरिंगचे घोटाळे बाहेर काढणार आहोत असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला. आघाडी सरकारमधील नेत्यांनी केलेल्या घोटाळ्यांचे होमवर्क करण्यासाठी आपल्याला नॉट रिचेबल व्हावे लागले असेही ते म्हणाले.या पुढला नंबर मंत्री अनिल परब,हसन मुश्रीफ आणि यशवंत जाधव यांचा असल्याचेही त्यांनी सांगितले. विक्रांत युद्धनौका प्रकरणी आपण एक रुपयाचाही घोटाळा केला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

किरीट सोमय्या यांना सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला होता मात्र उच्च न्यायालयाने त्यांना आज दिलासा दिला आहे. त्यानंतर तब्बल तीन दिवसानंतर किरीट सोमय्या आज मुंबईत माध्यमांसमोर आले. विक्रांत युद्धनौका प्रकरणी आपण एक रुपयाचाही घोटाळा केला नसल्याचे सांगताना पोलिसांनी संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर आधारित एफ आय आर घेतला असल्याचेही सोमय्या म्हणाले. याप्रकरणी आपल्या विरोधात पुराव्याचा एकही कागद ते सादर करू शकले नाही असे ते म्हणाले. आघाडी सरकारमधील नेत्यांच्या घोटाळ्याचा होमवर्क करण्यासाठी मला काही दिवस नॉटरिचेबल व्हावे लागले. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संपूर्ण ठाकरे कुटुंबियांनी नंदकिशोर चतुर्वेदी याच्या मदतीने कशा पद्धतीने मनी लॉंडरिंग केले ते आपण बाहेर काढणार आहोत. मंत्री अनिल परब, हसन मुश्रीफ आणि यशवंत जाधव यांच्याविरोधातील प्रकरणांना देखील येत्या दोन ते चार दिवसात गती मिळणार असल्याचेही किरीट सोमय्या म्हणाले.

Previous articleभाजपाच्या हिंदुत्वाबद्दल मुख्यमंत्री काय म्हणतात हे महत्त्वाचे नाही;हिंदुत्व हा भाजपाचा श्वास आहे
Next articleउदय सामंत यांची घोषणा : विद्यापीठांच्या ऑफलाईन परीक्षांसाठी प्रत्येक तासामागे १५ मिनिटे वाढीव वेळ